‘या’ बॅंकेच्या खातेदार-ठेवीदारांना दिलासा!

123

रुपी बॅंकेतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवी असलेल्या खातेदार-ठेवीदारांना त्यांची रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे. पाच लाखांपर्यंतच्या 64 हजार खातेदार-ठेवीदारांसाठी 700 कोटी रुपये विमा महामंडळाने मंजूर केले आहेत.मागील नऊ वर्षांपासून पैसे अडकवून पडलेल्या रुपी बॅंकेच्या खातेदार-ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.

मागील 9 वर्षे बॅंकेचे कामकाज पूर्णतः बंद

ठेव विमा महामंडळाच्या 2021 च्या सुधारित कायद्यानुसार पाच लाखांपर्यंतची ठेव मिळणेसाठी ठेवीदारांनी पाठविलेल्या अर्जांची छाननी व लेखापरीक्षण झाल्यानंतर एकूण 700 कोटींचे दावे ठेव विमा महामंडळाने मंजूर केले आहेत. त्यानुसार पाच लाखांपर्यंतच्या ठेव रकमा परत करण्याचे काम, अर्जांची पडताळणी करण्याची प्रकिया बॅंकेने सुरू केली आहे. येत्या महिनाभरात हे काम पूर्ण करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती रुपी बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडीत यांनी दिली. मागील नऊ वर्षे बॅंकेचे कामकाज पूर्णतः बंद आहे. अत्यल्प सेवक, जुनी संगणक यंत्रणा व संगणक कार्यप्रणालीतून उपलब्ध होऊ शकणारी माहिती व ठेव विमा महामंडळास उपलब्ध करुन द्यायची माहिती यामध्ये अपेक्षित सुसंगती नसणे, मयत ठेवीदार प्रकरणे, संयुक्त ठेवीदार यांची अर्जांमधील माहिती तसेच केवायसी निकषांची पूर्तता नसणे अशा अनेक अडचणी येत आहेत. या सर्व अडचणींविषयी ठेव विमा महामंडळास बॅंकेने निवेदनही दिले आहे. या बाबतीत ठेवीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.

(हेही वाचा – IPL 2022 : मुंबईतून होणार रणरंग्रामाला सुरूवात )

निर्बंधांना पुन्हा मुदतवाढ

आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर फेब्रुवारी 2013 मध्ये रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांना वारंवार मुदतवाढ मिळाली आहे. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत असलेल्या निर्बंधांना आणखी तीन महिने म्हणजेच 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंतची ही 28 वी मुदतवाढ आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.