पूर्व उपनगरातील पूरपरिस्थितीवर उपाय : पूर्व द्रूतगती महामार्गाखाली १० नाल्यांचे होणार रुंदीकरण

मुंबईत पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी नालेसफाईचे काम हाती घेतले जाते. परंतु दरवर्षी ही नालेसफाईची कामे केल्यानंतरही अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रवाह योग्यगतीने होत नसल्याने अनेकदा पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. अशाचप्रकारे सफाई केल्यानंतरही पाणी तुंबण्याचे प्रकार घडणाऱ्या पूर्व द्रृतगती महामार्गाखालील मोऱ्या अर्थात कल्व्हर्ट हे अरुंद असल्याने यातील सफाईसह ते रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यापैकी द्रृतगती महामार्गाखालून जाणाऱ्या १३ नाल्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे. यामध्ये १० नाल्यांचे रुंदीकरण तातडीने केले जाणार असून आसपासच्या नागरिकांना पुढील पावसाळ्यापूर्वी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : गोवंडी येथे बेस्ट बस व ट्रकचा अपघात )

मुंबई महापालिकेच्यावतीने जिथे जिथे पाणी तुंबण्याचे पूरप्रवण क्षेत्र बनत आहे, तेथील नाल्यांचा अभ्यास करत त्यांचे रुंदीकरण किंवा पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. याचा भाग म्हणून पूर्व द्रृतगती महामार्गाखालून जाणाऱ्या अरुंद नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नाले पुढे खाडीला जावून मिळतात. त्यामुळे या नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये महामार्गाखालून जाणाऱ्या १३ नाल्यांपैंकी १० नाल्यांचे रुंदीकरण करणे शक्य असल्याचे आढळून आले आहे. तर तीन नाल्यांच्या रुंदीकरणात अडचणी येत असून या नाल्यांमध्ये पिलर असल्याने कशाप्रकारे बायपास करता येईल किंवा अतिरिक्त नाला बांधता येईल का याचा विचार केला जात आहे.

मुंबई उपनगर आपत्कालिन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त(पूर्व) अश्विनी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पूर्व उपनगरातील नाल्यांच्या पाहणीनंतर त्यांनी या मुद्दयाबाबत पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी व एमएमआरडीएचे अधिकारी यांची बैठक घेतली घेतली. त्यामध्ये ज्या तीन नाल्यांच्या रुंदीकरणात अडचणी येत आहेत, तेथील नाल्यांची दोन्ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संयुक्त पाहणी करून अतिरिक्त नाला बांधता येवू शकतो किंवा कसे याबाबतचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहे. अश्विनी भिडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी पूर्व द्रृतगती महामार्गाखालील १३ नाले असून ते अरुंद आहेत. त्यांचे रुंदीकरण करणे आवश्यक असून या रुंदीकरणाच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीमध्ये १० ठिकाणी रुंदीकरण करणे शक्य असल्याचे दिसून आल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ही कामे होणार नसली तरी पुढील पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्याचा विचार आहे.

सोमय्या, लक्ष्मीबाग आणि कन्नमवार नगर नाल्यांवर विशेष लक्ष

पूर्व उपनगरात पाणी तुंबण्यास कारणीभूत असलेल्या सोमय्या नाला, लक्ष्मीबाग नाला आणि कन्नमवार नगर नाल्याचे रुंदीकरण यावर्षी होणार नाही. त्यामुळै यंदा विशेष लक्ष असून याठिकाणचा गाळ काढला जात जात असला तरी मात्र, याठिकाणी अतिरिक्त पंपही बसवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जेणेकरून आहोटीच्या वेळेत पाणी दुसरीकडे फेकता येईल,असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here