माथेरानकरांना कोरोना निर्बंध नको! काय आहे कारण?

माथेरान हे पर्यटनस्थळ मुंबईपासून जवळ असल्यामुळे अनेक पर्यटक शनिवार-रविवार तसेच सलग सुट्ट्यांचा आमंद घेण्यासाठी माथेरानची वाट धरतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरानमधील पर्यटनावर सुद्धा बंधने आली. परिणामी पर्यटक संख्याही मंदावली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरान खुले होते. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पर्यटनावरील निर्बंध हटवा आणि माथेरानवासीयांना जगण्याची मोकळीक द्या, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तमाम माथेरानवासीयांनी पत्रातून घातली आहे.

निर्बंध हटवा…

तिसऱ्या लाटेच्या नियमावलीनुसार पर्यटन स्थळे बंद आहेत. माथेरान बंद झाल्यास जवळपास ५० हजार स्थानिक लोकांवर उपासमारीची वेळ येईल. स्थानिकांचा, माथेरानमधील कुटुंबांचा विचार करून सरकारने हे नियम शिथिल करणे गरजेचे आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. केवळ पर्यटनावर इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे निर्बंध हटवा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

( हेही वाचा : कोरोनाची लक्षणं नसतील, तर तिस-याच दिवशी कामावर होऊ शकता रुजू! )

स्थानिकांचे जीवन पर्यटनावर अवलंबून…

लॉकडाऊन काळात स्थानिकांची अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. इथे अन्य व्यवसाय नसल्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणारे सर्व व्यापारी वर्ग, नागरिक, कष्टकरी लोक माथेरान अनलॉक होण्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते. त्यामुळे आता पुन्हा निर्बंध आल्यास स्थानिकांनी जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच निर्बंध हटवा आणि जगण्याची मोकळीक द्या अशी मागणी करत स्थानिकांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here