अखेर ‘तो’ दगड प्रभादेवी मंदिरासमोरून हटवलाच…

मुंबई महापालिकेने ब्रिटिशकालीन मैलाचे दगड शोधले असून ते त्या त्या ठिकाणी बसवण्याचे काम सुरु केले आहे. त्यातीलच एक दगड दादर, प्रभादेवी मंदिराच्या समोर बसवण्यात आला होता. मात्र त्याला विरोध होऊ लागला. हा विरोध इतका वाढला की, त्याचा परिणाम म्हणून अखेर हा बसवलेला मैलाचा दगड मंगळवारी, २८ डिसेंबर रोजी हटवण्यात आला.

काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकाने ब्रिटिशकालीन सापडलेला मैलाचा दगड दादर येथील श्री प्रभादेवी मंदिराच्या समोर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थानिक नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी तसा बॅनर लावला होता. त्यानुसार मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच खोदकाम करून तो दगड बसवण्यात आला होता. हे दगड बसवण्याच्या पद्धतीनुसार या दगडाच्या भवताली सुशोभिकरण करायचे होते. त्याआधीपासूनच त्या दगडाला विरोध होऊ लागला. काही जणांना या ठिकाणी ख्रिश्चनांचा क्रॉस बसवला जात आहे, असे वाटले. तर काही जण हा मैलाचा दगड आहे, पण त्याची ही मूळ जागा नाही,  ती जागा रस्त्याच्या पलीकडील आहे, असा मुद्दा मांडून त्याला विरोध केला.

शेवटी दगड झाला गायब!

या दगडाच्या संबंधी नवनवीन वाद निर्माण झाल्याने हे बांधकाम अपूर्णच राहिले होते. अखेर मंगळवारी, २८ डिसेंबर रोजी महापालिकेला हा दगड या जागेवरून हटवावा लागला. हा दगड जुना नसून तो नवीन बनवण्यात आला आहे. या दगडाची जागा मुळातच मंदिराच्या समोर नव्हती. तो दगड रस्त्याच्या पलीकडील पदपथावर होता. त्यामुळे हा दगड त्या ठिकाणीच बसवण्यात येणार आहे. मंदिराच्या समोर हा दगड बसवण्यासाठी कोणत्याही परवानग्या देण्यात आल्या नव्हत्या.

या दगडाची मूळ जागा मंदिराच्या समोर नव्हती. त्या दगडाची मूळ जागा शोधून त्या ठिकाणी तो दगड बसवण्यात येणार आहे. म्हणून त्यासाठी हा दगड हटवण्यात आला आहे.
– समाधान सरवणकर नगरसेवक.

या दगडाचे काय वैशिष्ट्य?

हा दगड ब्रिटिशकालीन आहे. मुंबईत असे एकूण १६ दगड सापडले आहेत. फोर्ट येथील सेंट थॉमस चर्चपासून पुढे अंतर मोजण्यासाठी हे मैलाचे दगड ब्रिटिशांनी बसवले होते. यात शेवटचा दगड चुनाभट्टी येथे बसवण्यात आला. त्या दरम्यानचा एक दगड दादर येथील प्रभादेवी मंदिराकडील होता.

(हेही वाचा नितेश राणेंचा ‘फैसला’ उद्यावर! न्यायालयात कुणी कसा केला युक्तीवाद?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here