वरळीतील रस्ते पुलाच्या पृष्ठभागावरील जोड मार्गावर मोठ्याप्रमाणात अंतर निर्माण झाले असून यामुळे बऱ्याच वेळा दुचाकीस्वारांचा अंदाज चुकत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागाची तातडीने दुरुस्ती होण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु वाहतूक पोलिसांकडून परवानगी दिली जात नसल्याने याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. केवळ व्हीआयपी मार्ग असल्याची कारणे देत वाहतूक पोलिसांकडून दुरुस्तीच्या कामाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे अपघात होण्याची वाट वाहतूक पोलिस पाहत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : रविवारी ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक!)
पुलाच्या भेगा पडलेल्या भागाची दुरुस्ती करण्यास परवानगी नाही
वरळी लव्हग्रोव्ह येथील रस्ते पूल हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास कार्पोरेशनच्या (एमएसआरडीसी)ताब्यात असून या पुलावरील दोन गर्डरमधील जोड भागांमध्ये मोठ्याप्रमाणात अंतर पडले आहे. त्यामुळे भरघाव येणाऱ्या दुचाकी स्वाराला अचानक ब्रेक लावावा लागतो. त्यामुळे या पुलावरून जाणाऱ्या चारचाकी वाहनांचाही यामुळे अपघात होण्याची भीती असल्याने एमएसआरडीसीने या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे अर्ज केला. मार्च महिन्यापासून वाहतूक पोलिसांकडे एमएसआरडीसीच्या माध्यमातून परवानगी मागितली जात असून आजतागायत या पुलाच्या भेगा पडलेल्या भागाची दुरुस्ती करण्यास परवानगी दिली नाही. परिणामी रोज अपघातांच्या घटना घडत आहे.
सामान्य जनतेचे हाल
याबाबत युवासेनेचे उपविभाग अधिकारी वरळी (विधानसभा) अभिजित पाटील हे वारंवार एमएसआरडीसी सोबत पत्रव्यवहार करत आहेत. परंतु आजतागायत त्यांच्या पत्राची दखल घेत याची दुरुस्ती केली जात नाही. अभिजित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित विभागांसोबत आपण वारंवार पत्रव्यवहार करून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत आहे. परंतु एमएसआरडीसी व वाहतूक पोलिसांच्या शाखेत ही दुरुस्ती रखडली असून यामुळे रोजच अपघात होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोघांच्या वादात सामान्य जनतेचे हाल होत आहे.
त्यामुळे येथे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी वाहतूक पोलिसांची राहणार असू भविष्यात होणाऱ्या अपघातांच्या घटना टाळण्यासाठी तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community