मुंबई वडोदरा महामार्गातील तब्बल ११०० झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय; देशातील पहिलाच प्रयत्न

153

मुंबई वडोदरा महामार्गातील तब्बल अकराशे झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय डहाणू वनविभागाने घेतला आहे. या महामार्गातील तब्बल ३० प्रजातींची अकराशे झाडे न तोडता इतर ठिकाणी पुनर्रोपण केली जाणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात अकराशे झाडे पुनर्रोपण करण्याची तयारी वनविभागाने दर्शवली असून, देशपातळीवर पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर महामार्गाच्या उभारणी दरम्यान येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.

( हेही वाचा : Shiv jayanti 2023: योगी सरकारच्या काळात शिवजयंतीच्या यात्रेत पोलिसांचा खोडा)

पालघर, सफाळे तसेच डहाणू या महामार्गावरील वनजमिनीची जागांवरील झाडांच्या कत्तलीसाठी केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदल विभागाकडे परवानगी पत्र आले होते. पहिल्या टप्प्यात १९ हेक्टर तर दुस-या टप्प्यात १९२ हेक्टर वनजमिनीवरील झाडे कापली जाणार आहेत. याबाबतीत गेल्या वर्षी पहिल्यांदाच मे महिन्यात केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदल विभागाच्या सदस्यांनी महामार्गातील वनविभागाच्या जागेची पाहणी केली. यातील झाडांच्या प्रजाती तसेच अपेक्षित झाडांच्या पुनर्रोपणाच्या सूचना वनविभागाला दिल्या. पावसाळ्यामुळे पुनर्रोपणासाठी योग्य असलेल्या झाडांच्या ओळखीचे काम वनविभागाकडून दिरंगाईने होत होते. कामाची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवड्यात केंद्रीय वने व पर्यावरण तसेच वातावरणीय बदलांची टीम गेल्या आठवड्यात पुन्हा डहाणू परिसराला भेट देऊन गेली. गेल्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ३०० झाडे वनाधिका-यांनी शोधली. फेब्रुवारी महिन्यापर्यंत अजून २०० झाडे मिळून तब्बल ५०० झाडे पुनर्रोपणासाठी योग्य असल्याची माहिती वनाधिका-यांनी केंद्राच्या सदस्यांना दिली. तब्बल अकराशे झाडे येत्या दोन वर्षांत पुनर्रोपित करण्याची वनाधिका-यांची योजना आहे. प्रकल्पाचे काम अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. पुनर्रोपणासाठी किती खर्च येईल, याबाबत आता सांगता येणार नाही, अशी माहिती डहाणू वनविभागाच्या अधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.