2022 यावर्षी भारतीय 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारतासाठी 26 जानेवारी हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. देशात दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त काही खास कार्यक्रम होणार आहेत. तसेच राजधानी दिल्लीच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिन परेड हे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण आहे. हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की, 26 जानेवारी ही तारीख प्रजासत्ताक दिनासाठी का निवडली गेली? या तारखेमध्ये इतके विशेष काय आहे की हा भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय सण बनला आहे. जाणून घेऊया या तारखेचा इतिहास.
दरवर्षी 26 जानेवारीला देशातील सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये मोठ्या थाटामाटात ध्वज फडकवला जातो. 1950 मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेनेच राज्यघटना स्वीकारली, पण अंमलबजावणी करून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला, त्यामागे एक विशेष कारण होते.
26 जानेवारी हाच दिवस का?
26 जानेवारी 1930 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वराज म्हणून घोषित केले. 20 वर्षांनंतर त्याच दिवशी राज्यघटना लागू झाली. पूर्ण स्वराज घोषणेच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.
राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण
26 जानेवारी 1950 रोजी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी देऊन ध्वजारोहण केले आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले. तेव्हापासून देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या तारखेला देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती या कार्यक्रमात सामील होतात आणि ध्वजारोहण करतात.
( हेही वाचा: पद्म पुरस्काराची घोषणा : सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह यांच्यासह चौघांना पद्म विभूषण..वाचा संपूर्ण यादी )
भारताचे संविधान
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय संविधानाची निर्मिती झाली. बाबासाहेब भीमराव आंबेडकरांना राज्यघटनेचे जनक म्हटले जाते, पण देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांव्यतिरिक्त 210 लोकांचा हात होता. संसद भवनाच्या ग्रंथालयातील नायट्रोजन गॅस चेंबरमध्ये हाताने बनवलेल्या कागदावर हाताने लिहिलेली भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत ठेवण्यात आली आहे. जेणेकरून संविधानाची मूळ प्रत जतन करता येईल.
Join Our WhatsApp Community