अजगराची शेपटी कापली, तरी गुन्हा दाखल नाही! प्राणी मित्रांमध्ये संताप

99

अजगराची शेपटी कापून त्याला दुतोंड्या मांडूळ साप बनवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील वांद्रे येथे घडला आहे. या घटनेला पोलिसांनी गंभीरतेने न घेता केवळ ठाणे दैनंदिनीत त्याची नोंद केल्यामुळे प्राणी मित्रांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. एवढा संतापजनक प्रकार मुंबईसारख्या शहरात घडून देखील पोलिस या घटनेला गंभीरतेने घेत नाही, हे त्यापेक्षा भयंकर असल्याचे ‘बॉम्बे ऍनिमल्स राईट्स’ या संस्थेचे पदाधिकारी विजय मोहनानी यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ सोबत बोलताना म्हणाले. ‘बॉम्बे एनिमल्स राईट्स’कडून या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊ, असेही मोहनानी म्हणाले.

Snake1

रुग्णवाहिकेत असलेल्या एका गोणीत साप 

वांद्रे पश्चिम भाभा रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेत एक साप असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एकाने फोन करून दिली होती. वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेत असलेल्या एका गोणीत साप असल्याचे खात्री होताच पोलिसांनी सर्पमित्र यांना बोलावून घेतले. सर्पमित्र सिद्धार्थ कांबळे आणि दक्ष बेरडीया या दोघांनी भाभा रुग्णालयात धाव घेऊन रुग्णवाहिकेतील साप असलेली गोणी बाहेर घेऊन ती उघडली असता, त्यात बिनविषारी अजगर मिळाला. धक्कादायक बाब म्हणजे या अजगराची शेपूट कापण्यात आली होती आणि त्या ठिकाणचा भाग सुई दोऱ्याने शिवण्यात आला होता व अजगराला तपकिरी रंगाचा रंग लावून त्याला दुतोंड्या मांडूळ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या वांद्र्यात अजगराला मांडूळ बनवून तस्करी!)

प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल पाहिजे

सर्प मित्रांनी हा सर्व प्रकार वांद्रे पोलिसांच्या लक्षात आणून दिला आणि हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र वांद्रे पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने न घेता केवळ पोलिस ठाण्यातील ठाणे दैनंदिनीमध्ये त्याची नोंद करून हा अजगर सर्पमित्राच्या ताब्यात देण्यात आला होता. अजगराची शेपूट कापून त्याला सुई दोऱ्याने शिवून त्याला रंगरंगोटी करून मांडूळ बनवण्याचा ज्या व्यक्तीने हा क्रूरपणा केला त्याच्यावर प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल पाहिजे होता. मात्र पोलिसांची गुन्हा दाखल न करता केवळ डायरी एंट्री करून प्रकरण गंभीरतेने घेतले नसल्यामुळे प्राणी मित्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बॉम्बे एनिमल्स राईट्स या संस्थेकडून याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असून या अजगरावर क्रूरपणे वागणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेऊन अटक करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे बॉम्बे एनिमल्स राईट्सचे पदाधिकारी विजय मोहनानी यांनी म्हटले आहे.

कोणीतरी हा खोडसाळपणा केला असावा, ठाणे दैनंदिनीत नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
– मनोहर धनावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वांद्रे पोलिस ठाणे.

 अजगराला घेऊन जाणाऱ्या सर्पमित्राचा अपघात 

सर्प मित्र यांनी ठाणे वन विभागाशी संपर्क साधून हा अजगरावर उपचार होण्याची माहिती वनविभागाला दिली आणि अजगराला वनविभागाकडे सोपवण्यासाठी सर्पमित्र  सिद्धार्थ कांबळे आणि दक्ष हे दोघे मोटारसायकल वरून ठाणेच्या दिशेने निघाले असता वांद्रे कलानगर नवीन उड्डानपुलावर त्यांच्या मोटससायकलचा अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बीकेसी पोलिस अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेत अजगर मिळतो, त्याला वेदनादायक त्रास देऊन त्याचा मांडूळ बनवण्याचा प्रयत्न केला जातो, हे कृत्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
– विजय मोहनानी, बॉम्बे अनिमल्स राईट्स

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.