तौक्ते वादळाने मुंबईत अक्षरशः थैमान घातले, काही तासांत उलथापालथ केली. यात समुद्राच्या कचाट्यात जे कोणी सापडले त्यांना वाचवण्यासाठी अवघ्या किनारपट्टीत सर्व यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत होत्या. त्यात नौदलाकडून बॉम्बेहाय येथे मागील ३ दिवसांपासून सुरु असलेल्या बचाव कार्याची विशेष चर्चा सुरु आहे. पण मुंबईच्याच किनाऱ्यावर अशाही ठिकाणी त्याच वेळी आणखी एक बचाव कार्य सुरु होते. तुंटपुज्या साधनसामुग्रीचा साहाय्याने ६ जीव या बचाव कार्याच्या माध्यमातून वाचवण्यात आले. हे बचाव कार्य करणारे आहेत मोटार परिवहन विभागातील नौका विभागाचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी!
प्रचंड वेगाने वाहणारा वारा, उंच लाटा यांना सामोरे जात तीन बोटींमध्ये अडकलेल्या ६ जणांची आम्ही सुखरूप सुटका केली. त्यातील दोन बोटी एकमेकांना रस्सी बांधलेल्या परिस्थितीत वाहत येत होत्या. त्यांना थांबवणे गरजेचे होते. शर्थीचे प्रयत्न करून समोरील बाजूच्या जेटीच्या आडोश्याला दोरखंड आणि मॅटल रोपच्या सहाय्याने त्या बांधण्यात आल्या. सोसाट्याचा वारा, उंच उसळणाऱ्या लाटा यामधून या दोन बोटी किनाऱ्याला आणण्याचे काम केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही करू शकलो. त्या दोन्ही बोटींमधून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या ५ जणांनी अक्षरशः हात जोडून आभार मानले.
– मिलिंद तांडेल, पोलिस उपनिरीक्षक, नौका विभाग, मुंबई.
खवळलेल्या समुद्रातून बोटी आणल्या किनारी!
१७ मे रोजी तौक्ते वादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकले आणि समुद्रकिनारी ज्या ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत, त्या सगळ्या सक्रिय झाल्या. त्यात नौदल असो, तटरक्षक दल असो, या सर्वांनी समुद्रात बचाव कार्यासाठी पुढाकार घेतला. त्याच वेळी भाऊचा धक्का आणि माझगाव डॉक यांच्यामध्ये तीन बोटी समुद्राच्या तडाख्यात सापडल्याची माहिती मिळताच नौका विभागाच्या पोलिसांनी त्या बोटीवर अडकलेल्यांसाठी बचावकार्य हाती घेतले. त्यावेळी नौका विभागाचे २ अधिकारी आणि ३ हवालदार या ५ जणांनी जीवाची बाजी लावून हे बचाव कार्य केले. या बोटींपैकी एका बोटीवर १ खलाशी होता, त्याची बोट हेलकावे खात असतानाच दुर्दैवाने ती बोट बुडाली, मात्र त्यावरील खलाशाला सुखरूप वाचवण्यात आले. त्यांनतर अन्य दोन बोटी ह्या एकमेकांना रस्सीने बांधलेल्या स्थितीत वाहत येताना दिसल्या. त्यामध्ये ५ व्यक्ती होत्या. हेलकावे खात असलेल्या या बोटींना नियंत्रणात आणून त्यात अडकलेल्या खलाशांची सुटका करण्याचे आव्हान होते. या 2 बोटींमध्ये अनुक्रमे २ आणि ३ व्यक्ती अडकल्या होत्या. या दोन्ही बोटी खवळलेल्या समुद्रात हेलकावे खात होत्या. अशावेळी नौका विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरखंडाच्या साहाय्याने वाहत चाललेल्या त्या दोन बोटींना शर्थीचे प्रयत्न करून किनाऱ्याला आणून त्यातील ५ जणांची सुखरूप सुटका केली.
(हेही वाचा : मृतांचा आकडा ३७! बेपत्ता कामगारांना शोधण्याचे नौदलाचे प्रयत्न सुरूच!)
Join Our WhatsApp Community