बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेवर निर्बंध लादल्याचे समोर आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदगरवर अनेक निर्बंध लादले आहेत. या लादलेल्या निर्बंधांनुसार, बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा दहा हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
हे निर्बंध म्हणजे बँकिंग परवाने रद्द?
यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून असेही सांगण्यात आले की, बँकेचे ग्राहक त्यांच्या खात्यातून दहा हजार रूपयांहून अधिक रक्कम काढू शकणार नाही. ग्राहकांना या निर्बंधाबद्दल माहिती मिळावी, याकरता नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावली आहे. तर हे निर्बंध म्हणजे बँकिंग परवाने रद्द करण्यात आला असे नाही, असेही म्हटले आहे.
(हेही वाचा- संसार थाटण्यासाठी तिने केले असे, पण तुरूंगात रंगवतेय संसाराची स्वप्ने)
निर्बंध लागू झाल्यानंतर…
रिझर्व्ह बँकेने लादलेले हे निर्बंध बँकिंग नियमन कायद्यांअतर्गत 6 डिसेंबर 2021 रोजी कामकाजी वेळ संपल्यापासून सहा महिन्यांच्या काळासाठी लागू असणार आहे. यासह त्याचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटल्याप्रमाणे बँक त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे कर्ज, अग्रिम देणार नाही यासह कर्जाचे नूतनीकरण करणार नाही. तसेच, या निर्बंधानुसार, बँकेकडून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, कोणत्याही प्रकारचे दायित्व घेणे, पेमेंट करण्यासह मालमत्तेचे हस्तांतरण, विक्री करणे प्रतिबंधित असणार आहे.