रूपी बँकेनंतर आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई! तुमचं ‘या’ बँकेत खातं तर नाही ना?

सोलापुरातील सुमारे 100 वर्ष जुन्या द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रद्द केला आहे. लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले असून या बँकेत सुमारे 94 हजार ग्राहकांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडियाने लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेवरती प्रशासक नियुक्त केलेला आहे. बँकेचे ठेवीदार 5 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर दावा करू शकतात, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – “…तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”, ‘या’ मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा)

या सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने सध्याच्या ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करण्याच्या स्थितीत नसल्याचे आरबीआयने म्हटले आहे. बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा करताना मध्यवर्ती बँकेनं म्हटले आहे की, बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 95 टक्के ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनमार्फत दिल्या जातील. जर बँक बुडली, तर प्रत्येक ठेवीदाराला नवीन नियमांनुसार ठेव रकमेवर विमा दावा करण्याचा अधिकार असून, त्याची मर्यादा पाच लाखांपर्यंत आहे.

बँकेची 105 कोटी रुपयांची थकबाकी

द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेची 105 कोटी रुपयांची थकबाकी कर्जदारांकडे आहे. लवकरच या थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार असल्याचे बँक व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here