कोविड काळात केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांनी चांगल्याप्रकारे सेवा बजावत रुग्णसेवेला वाहून दिले होते. कोविड काळात केलेल्या या कामाबाबत मुंबई महापालिकेच्यावतीने या सर्व निवासी डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाप्रित्यर्थ त्यांना ऋण निर्देश म्हणून प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दोन महिन्यांच्या मासिक पगारासोबत दिली जाणार आहे.
निवासी डॉक्टरांचे योगदान
मुंबईमध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२० रोजी देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्यातील शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अर्थात कनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी डॉक्टरांनी कोविड बाधित रूग्णांना उपचार देण्यात महत्वाचे योगदान दिले. त्यामुळे या निवासी डॉक्टरांना योगदानप्रित्यर्थ ऋणनिर्देश म्हणून प्रतिकात्मक रक्कम अदा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार ६ ऑक्टोबर २०२१ रोजी शासनाने निर्णय घेतला.
( हेही वाचा : परिचारिका म्हणजे खऱ्या देवदूत! महापौरांच्या हस्ते सन्मान )
यामध्ये शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांना अमुल्य योगदानाप्रित्यर्थ प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये एवढी प्रतिकात्मक रक्कम अदा करण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार ही रक्कम केईएम, शीव, नायर आणि कुपर या महापालिका विद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २१५५ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यामुळे यासाठी २६ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांचे अधिदान केले जाणार आहे.
केईएम,शीव, नायर आणि कुपर वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांची संख्या :
- कनिष्ठ निवासी अधिकारी ग्रेड १ : ५६९
- कनिष्ठ निवासी अधिकारी ग्रेड २ : ६५४
- कनिष्ठ निवासी अधिकारी ग्रेड ३ : ५७८
- वरिष्ठ निवासी अधिकारी ग्रेड १ : ११६
- वरिष्ठ निवासी अधिकारी ग्रेड २ : ९९
- वरिष्ठ निवासी अधिकारी ग्रेड ३ : १०६
- सेवांतर्गत निवासी वैद्यकीय अधिकारी : ३३
निवासी डॉक्टर रुग्णालयनिहाय
- केईएम रुग्णालय : १०५५
- शीव रुग्णालय : ६०४
- नायर रुग्णालय : ४९१
- कुपर रुग्णालय : ५