अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई मार्गावरील दोन वानरांनी अचानक शाळेकडे मोर्चा वळवत शाळकरी मुले तसेच परिसरातील तबब्ल १५ जणांना चावा घेतला आहे. त्यापैकी दोन शाळकरी मुले आणि एका महिलेला गंभीर जखम झाली. महिलेला चार बंगला येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यावे लागले. तब्बल तीन आठवड्याच्या परिश्रमानंतर वनविभाग आणि वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) या प्राणीप्रेमी संस्थेने गेल्या आठवड्यात वानरांना पकडले.
वानर शाळेत ये-जा करायचे
२० जुलैपासून अंधेरीतील वीरा देसाई परिसरातील एमव्हीएम शाळा आणि सेंट कॅथरिन शाळेच्या संकुलात दोन वानर फिरत असल्याची तक्रार डब्ल्यूडब्ल्यूए या प्राणीप्रेमी संस्थेकडे आली. अंधेरी भागात वानरांचा वावर असल्याची माहिती मिळताच संस्थेच्या प्राणीप्रेमींनी शाळा परिसराला भेट दिली. दोन्ही शाळा शंभर मीटरच्या अंतरावर असल्याने वानर एका शाळेतून दुस-या शाळेत ये-जा करायचे. शाळ सुटण्याच्या वेळी मुलांना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्रास देणे, पाठलाग करणे, अंगावर येणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी सतावू लागले. त्यापैकी एम व्ही एम शाळेच्या तेरा वर्षांच्या तर सेंट कॅथरिन शाळेच्या चौदा वर्षांच्या मुलीचा वानरांनी चावा घेतला. वानरांनी घरासाठी अंधेरी पश्चिमेतील बांधकाम सुरु असलेल्या नव्या इमारतींना पसंती दिली होती. दिवसाचा बराच काळ दोन्ही वानर या इमारतींवर आढळून यायचे. डब्ल्यूडब्ल्यूएच्या प्राणीप्रेमींनी माकडांना पिंज-यात अडकवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पिंज-यात अन्नपदार्थ ठेवले. दोन्ही वानर पिंज-यात येतच नव्हते, अशी माहिती डब्ल्यूडब्ल्यूएचे प्राणीप्रेमी राज जाधव यांनी दिली.
(हेही वाचा धनंजय मुंडे फडणवीसांचा भेटीला; राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण
वानरांनी मोर्चा महाविद्यालयाकडे वळवला
वानरांनी अंधेरी पश्चिमेकडून पूर्वेकडील तोलानी महाविद्यालयात मोर्चा वळवला. तिथूनही वानर त्रास देत असल्याच्या डब्ल्यूडब्ल्यूएच्या प्राणीमित्रांना तक्रारी आल्या. तोलानी महाविद्यालयाच्या परिसरातील ही दोन वानरे शाळकरी मुलांना त्रास देणारीच असल्याचे प्राणीप्रेमींच्या लक्षात आले. काही दिवसांनी वानर पुन्हा अंधेरी पश्चिमेकडे परतले. शाळेच्या आवारात येऊन वानर त्रास देत असल्याने मुलांनी घाबरुन शाळेत जायलाही टाळाटाळ सुरु केली.
वनाधिका-यांनी बेशुद्ध करुन पकडले
अखेर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यप्राणी बचाव पथकाच्या टीमने वानरांना बेशुद्ध करुन पकडण्याचा निर्णय घेतला. दोन्ही वानर पंधरा फुटांच्या झाडावर बसलेले असताना वनाधिका-यांनी त्यांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन मारले. वानरांना जमिनीवरुन पडून त्यांना गंभीर इजा होण्याची भीती होती. त्यासाठी प्राणीमित्रांनी जमिनीवरुन चार फुटांच्या अंतरावर जाळी पसरवली. दोन्ही वानरांना तातडीने नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
Join Our WhatsApp Community