कांदिवलीतील चारकोप परिसरातील श्रध्दा सहकारी सोसायटीतील नागरिकांना शनिवारी सोसायटीतील परिसरात सापांची इवलुशी पिल्ले दिसली. काही इंचाची काळ्या रंगाची पिल्ले पाहून रहिवाशांनी प्राणीप्रेमी संस्थांना मदतीसाठी फोन केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने रहिवाशानीच पिल्लांमागे बादली घेऊन एकेकाला पकडून त्यात टाकण्यास सुरूवात केली. संध्याकाळी प्राणीमित्र आल्यानंतर गोड्या पाण्यात राहणा-या पाणभिवड या बिनविषारी सापाची ही पिल्ले असल्याचे समजल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
(हेही वाचा -घरात सुरु झाला सापांचा ‘ भुलभुलैय्या ‘)
७ पाणभिवडच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडले
रहिवाशांनी सापांच्या पिल्लांना पकडण्याचा कार्यक्रम सुरु केलेला असतानाच स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्लाइल्स एण्ड रिहेबिलिटेशन (सर्प) या प्राणीप्रेमी संस्थेच्या देवांग दवे आणि सुजित साळुंखे यांनी मदतीसाठी फोन येताच घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या आवारातून दोघांनी ७ पाणभिवडच्या पिल्लांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. विरार येथील एका नागरिकाच्या घरातूनही आठवड्याभरात ‘सर्प’च्या स्वयंसवेकांनी १३ पाणभिवडची पिल्ले बाहेर काढली होती. कपाट, बाथरुम तर पाण्याच्या टाकीतून ही पिल्ले बाहेर पडत होती. या सततच्या घटनेने विरारमधील कुटुंबीय घाबरलेले असल्याने विरारपाठोपाठ कांदिवलीतील चारकोप परिसरातही पाणभिवड या गोड्या पाण्यातील बिनविषारी सापाबाबत ‘सर्प’ने जनजागृती करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्ताने सर्पचे स्वयंसेवक जनजागृती करत घाबरुन सापांना मारू नका, संस्थेच्या हेल्पलाईनला फोन करा, असे आवाहन करत होते. तेवढ्यातच दुपारी पुन्हा श्रध्दा सहकारी सोसायटीतून हेल्पलाईन क्रमांकावर पाणभिवडाची पिल्ले दिसल्याची तक्रार आली. जनजागृती अर्धवट सोडत देवांग दवे आणि सुजित साळुंखे पुन्हा घटनास्थळी धावले आणि ९ पाणभिवडीच्या पिल्लांना पकडून निसर्ग अधिवासात सोडले.
पाणभिवडाची पिल्ले सतत दिसण्यामागील कारण
पाणभिवड या गोड्या पाण्यात राहणारा साप भारतभर आढळतो. मुंबई किना-यालगतही नदी, नाले आणि तलावात पाणभिवड दिसतात. एप्रिल- मे महिन्यात पाणभिवडाची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. दहा दिवसांची पिल्ले उड्या मारत चालायलाही शिकतात. सध्या पाणभिवडांना सहज मिळणारे उंदीर हे भक्ष्य मानवी वस्तीजवळ आकर्षित करत आहे. त्यामुळे कच-याची विल्हेवाट लावा, अन्यथा यंदाचा मे महिनाही पाणभिवडांना मानवी वस्तीजवळ आकर्षित करेल, असे आवाहन ‘सर्प’चे पालघर जिल्हाप्रमुख पंकज जाधव यांनी केले. पावसात छोटीछोटी डबकी तयार होतात. दोन महिन्यांची पाणभिवडची पिल्ले पावसात नैसर्गिक जलसाठ्यातच आढळतात. भक्ष्य खायला जमिनीवर आढळून येतील. त्यांना मारु नका, अशी विनंती जाधव यांनी केली.
Join Our WhatsApp Community