जे.जे रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांच्यासहित इतर वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. या रुग्णालयातील काही निवासी डॉक्टरांनी वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाचा आरोप करीत संप पुकारल्यामुळे डॉ. लहाने यांच्यासहित नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य शासनाने तो मंजुर करीत त्यांच्या जागी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
सर जे.जे रुग्णालयातील नेत्र विभागात पदव्युत्तर शाखेच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या २८ निवासी डॉक्टरांनी आपल्याला शस्त्रक्रिया करू दिल्या जात नाहीत, तसेच अपमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप मार्डच्या माध्यमातून अधिष्ठातांकडे केला होता. या तक्रारीविरोधात चौकशी करीत नेत्ररोग चिकत्साविभागाने स्पष्टीकरण दिले; मात्र त्याने समाधान न झाल्याने मार्डने संपाचे हत्यार उगारले. त्यानंतर निवासी डॉक्टरांनी केलेले आरोप खोटे असल्याचा दावा करीत नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख, डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी, ३१ मे रोजी राजीनामा दिला. आता या सर्वांचा राजीनामा राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. तसेच डॉ. रागिणी पारेख यांची स्वेच्छानिवृत्तीही राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे.
सरकारचे आभार!
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, ‘मी ३१ मे रोजा राजीनामा दिला होता. कारण आमच्यावर जे आरोप करण्यात आले, त्यावर आमचे मत विचारात न घेता अहवाल सादर करण्यात आला होता. निवासी डॉक्टरांनी खोटे आरोप केल्यानंतर व्यथीत होऊन आठ जणांनी राजीनामा आणि एकाने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आम्ही राजीनामा स्वीकारण्याची विनंती सरकारकडे केली होती. त्यामुळे आता राजीनामा मंजूर केल्याबद्दल मी सरकारचे मनापासून आभार मानतो,’ असेही लहाने म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community