राष्ट्राचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व राखण्यासाठी हिंदूंनो, ‘हमही हमारे वाली है!’ असा दृष्टीकोन ठेवा!

101

आपल्या देशाने १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्य प्राप्त केले त्याला आज पाऊणशे वर्षे पूर्ण झाली. आपल्या देशाचा इतिहास हा सत्ययुगापासूनचा आहे. म्हणजेच आपल्या देशाची ऐतिहासिक परंपरा अत्यंत प्राचीन आहे. या जगातल्या सर्वात प्राचीन परंपरेचा आपण अभिमान बाळगला आणि व्यक्त केला तर त्यात चूक असे काही नाही.

आपल्या देशावर शक, हुण, ग्रीक, मुसलमान, ख्रिश्चन अशा अनेकांनी आक्रमण केले. शक आणि हुण यांचे तर आज अस्तित्वच राहिले नाही. या सर्व परकीय आक्रमकांना आपण पराभूत करून आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. काही परकीय आक्रमकांनी आपल्यावर आक्रमण करून काही काळ त्यांची राजकीय सत्ता आपल्या देशात स्थापन केली. तरीसुद्धा एकाही परकीय आक्रमकाला एकाच वेळी संपूर्ण हिंदुस्थानात त्यांची सत्ता प्रस्थापित करता आली नाही. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान कधीही परकीय आक्रमक सत्तेखाली आला नाही.  परकीयांनी केलेले आक्रमण हे केवळ राजकीय आक्रमण नव्हते. ते राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक आक्रमण होते. त्यांनी राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपला धर्म आणि आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तथापि त्यांना त्यात यश आले नाही. ही गोष्ट सुद्धा आपण विसरता कामा नये.

आपण सारेच सनातन धर्माचे अनुयायी 

वेदांमुळे आपल्या देशाच्या महानतेची उंची गगनाला जाऊन भिडली आहे. या वेदांबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, ‘वेद हे असे वाङ्मय आहे की पंचमहाभूतात्मक सृष्टीचे ज्ञान करून घेण्यासाठी आद्य मानवाने निसर्ग शक्तीशी ज्या प्रचंड झुंजी दिल्या त्याचे वर्णन त्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या घोर अज्ञान तिमिराने अमृतकुंभ हरण करून तोही अप्राप्य करून ठेवला होता आणि मनुष्याच्या सुप्त आत्म्याला जागृती आणणारे ज्ञान सूर्याचे किरण ज्याने आतापर्यंत मानवापर्यंत पोहोचू दिले नव्हते त्या निबिड अज्ञान अंध:काराची प्रकाशाशी जी पहिली भीषण चकमक जडली तिचाही इतिहास वेदांमध्ये गठीत करून ठेवण्यात आला आहे.’ आपल्या देशातील प्रत्येक हिंदूला वेदांविषयी अभिमान वाटला पाहिजे. आपण सारेच सनातन धर्माचे अनुयायी आहोत. या सनातन म्हणजेच अविनाशी धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. सावरकर या सनातन धर्माला शाश्वत धर्म म्हणून संबोधतात. सनातन धर्माची तत्त्वे अविनाशी आहेत. या तत्त्वांना स्थलकालाचे बंधन नाही. म्हणूनच हा सनातन धर्म प्रलयाच्या आधीही होता आणि प्रलयानंतरही तो राहील, असे सावरकर म्हणतात.

(हेही वाचा राज्‍यात शासकीय कार्यालयांत ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात)

हिंदू भूमीशी एकनिष्ठ

भगिनी निवेदिता यांनी या भारतभूला आपली पितृभूमी मानले.‌ म्हणजेच त्यांनी स्वेच्छेने हिंदू धर्माची दीक्षा घेतली. एवढेच नव्हे तर त्यांनी या भूमीवर नितांत प्रेमही केले. आजही असे अनेक परकीय नागरिक आहेत ज्यांनी स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला आणि ते या भूमीशी एकनिष्ठ झाले. या आधुनिक काळात फोर्ड कंपनीचे मालक अल्फर्ड फोर्ड यांनी आणि त्यांच्या पत्नीने वर्ष १९७४ मध्ये स्वेच्छेने हिंदू धर्म स्वीकारला. त्यांनी प्रभुपादांचे शिष्यत्व स्वीकारले. हिंदू धर्माच्या अनुयायांनी शस्त्रबळावर कधीही कोणाचाही धर्म बदलला नाही. सावरकर म्हणतात, ‘हिंदू आई-बापाच्या पोटी जन्माला आलेल्या एखाद्या माणसाला हिंदुत्वात समाविष्ट करून घेतले तरी त्याला हिंदू असे तेव्हाच म्हणता येईल की जेव्हा तो आमच्या देशाला स्वतःचा देश मानेल. हिंदूंशी विवाह करून या देशावर पितृभू प्रमाणे प्रेम करेल.‌ त्याच्या जीवनात आमच्या संस्कृतीचा स्वीकार करून या देशाला पुण्यभूमी म्हणून पूज्य समजू लागेल या नवीन दांपत्यापासून निर्माण होणारी संतती इतर सर्व गोष्टी सारख्याच असल्यामुळे नि:संशय हिंदूच समजली जाईल.’

आपल्या देशाचे स्वातंत्र्य आपल्याला जर अबाधित ठेवायचे असेल तर सावरकरांचा हा विचार, सावरकरांचे हे मार्गदर्शन दुर्लक्षित करून चालणार नाही. आपली मातृभूमी ही ऋषीमुनी आणि साधुपुरुषांच्या तपश्चर्येने, त्यांनी आचारलेल्या कर्मयोगाने पवित्र आणि पावन झाली आहे. वशिष्ठ, याज्ञवल्य, पराशर , कपिल, गौतम, व्यास, वाल्मिकी , विश्वामित्र, वैशंपायन या आणि अशा अनेक ऋषींचा जन्म याच पुण्य आणि पवित्र भूमीत झाला. चक्रधर स्वामी, बसवेश्वर, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, रामदास स्वामी , तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सजनक कसाई, भानुदास, संत कबीर, मिराबाई , कान्होपात्रा, संत सखु, चोखामेळा या आणि अशा अनेक संत महंतांनी आपल्या विचारांनी आणि वाणीने आपल्या या भूमीचा नावलौकिक वाढवला आहे. आपली मातृभूमी ही वीर प्रसवा म्हणून गौरवली जाते. मातृभूमीच्या, धर्माच्या, संस्कृतीच्या रक्षणार्थ अनेकांनी आपले प्राण अर्पण केले आहेत.

शेकडो देशांमध्ये आपली भारतभूमी अत्यंत भाग्यवान 

यात गुरुगोविंद सिंग यांचे पुत्र, मदनलाल धिंग्रा, कान्हेरे, खुदीराम बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती संभाजी महाराज, आणि वर्तमान काळात आपल्या राष्ट्राचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करणारे आपले वीर जवान, या सर्वांमुळेच हा देश घडला आहे. या शूर वीरांची आत्मयज्ञाची, ऋषीमुनी आणि संतांच्या ज्ञानाची, चंद्रशेखर व्यंकट रमण, जगदीश चंद्र बोस, डॉक्टर होमी भाभा, वराहमिहीर, आर्यभट, बोधायन, भास्कराचार्य अशा वैज्ञानिकांची , गणित तज्ज्ञांची ही परंपरा अशीच अखंड चालू राहिली पाहिजे. वाल्मिकी, व्यास, कालिदास, भवभूती, महाकवी हर्ष, भरतृहरी, पासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंतची महाकवींची परंपरा जतन करायची आहे. सावरकरांच्या लेखी आपली मातृभूमी ही परमेश्वराची लाडकी कन्या आहे. याचे कारण सांगताना सावरकरांनी म्हटले, ‘सकल सौभाग्याने नटलेली आमची ही भूमाता देवाची अत्यंत लाडकी अशी कन्या आहे. तिच्या नद्यांचे पाणी अथांग आणि संतत वाहणारे आहे. तिची भरगच्च पिके प्रतिवर्षी निघतात.‌ तिच्या स्वाभाविक गरजा फारच थोड्या आहेत.‌ नुसती इच्छा प्रकट करताच त्या पुरवण्यासाठी प्रेम निसर्ग हात जोडून सदैव सिद्ध आहे. नानाप्रकारचे पशु-पक्षी आणि श्वापदे , विविध प्रकारच्या फळाफुलांचे वृक्ष, लता, वेली यांनी ही भूमी गजबजलेली आहे. या सर्वांचे कारण आपल्याला प्रकाश आणि उष्णता देणारा तो सूर्य नारायणच आहे. हे सुद्धा तिला पक्के माहीत आहे. हिमव्याप्त भूप्रदेशांचा तिला कधीच हेवा वाटला नाही.‌ बर्फाखाली अनेक महिने गाडले जाणारे ते प्रदेश त्यांचे त्यांनाच लखलाभ असोत! थंड वायुमानात कष्टाची कामे करण्यास उत्साह प्राप्त होत असेल परंतु इकडच्या उष्ण वायुमानामुळे ते कष्ट करण्याचीच फारशी आवश्यकता उरत नाही. सदा शुष्क आणि कोरड्या घशापेक्षा आपली तहान शीतल मधुर जलपानाने शमविण्यातच तिला अधिक आनंद वाटतो… तिची धान्याची कोठारे सदोदित अन्नधान्याने भरलेली असतात. तिचे जल स्फटिकासारखे शुद्ध आहे. तिची फुले सुवासमत्त आहेत. तिची फळे रसाळ आहेत. तिच्या वनस्पतींमध्ये औषधी गुण आहेत. उषेच्या दिव्य रंगातून ती आपली कुंचली बुडवून घेते.  गोकुळच्या गायनाचे आलाप तिच्या बासरीतून उमटत असतात. नि:संशय आमची ही भूदेवी सकल श्रीसौभाग्याने नटलेली परमेश्वराची अत्यंत लाडकी अशी कन्या आहे.’ भगवंताची लाडकी कन्या असलेल्या आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या पृथ्वीवर शेकडो देश आहेत. या शेकडो देशांमध्ये आपली भारतभूमी अत्यंत भाग्यवान आहे. या भारतभूमीला लाभलेली पवित्र आणि संस्कृत भाषा पूर्णत्वाला पोहोचली आहे. पृथ्वीवरील उर्वरित देशांमध्ये अशी पूर्णत्वाला पोहचलेली कोणतीही भाषा नाही. अशा संस्कृत भाषेचा वारसा आपल्याला लाभला हे आपले परम भाग्य आहे. आपणच आपल्या या परमश्रेष्ठ आणि परिपूर्ण असलेल्या संस्कृत भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. तिचे जतन केले पाहिजे. आपल्या या भाषेचा अभिमान आपल्या वाचून अन्य कोणीही बाळगणार नाही. त्यांनी आपल्या या संस्कृत भाषेला कितीही हिणवले तरीसुद्धा आपण तिचे श्रेष्ठत्व जपले पाहिजे.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात असा होणार स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा!)

राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व जपण्याचे दायित्व हिंदूंचे

तोच देश स्वतंत्र ज्या देशाला त्याची स्वतःची भाषा असते. संस्कृत ही आपल्या देशाची स्वतःची भाषा आहे. तिला बाजूला सारून परकीय भाषेचा स्वीकार करणे हे कपाळ करंटेपणाचे लक्षण आहे. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आपण परकीय भाषेची गुलामगिरी लाथाडली पाहिजे. याचा अर्थ परकीय भाषा शिकायची नाही असा होत नाही. परकीय भाषेला श्रेष्ठ मानून आपल्या भाषेला लाथाडणे ही गुलामगिरीची मानसिकता आहे. विरोध आहे तो गुलामगिरीची मानसिकता जपण्याला! स्वातंत्र्यामध्ये सूर्याचे तेज आहे, सागराची गंभीरता आहे, स्वातंत्र्य राष्ट्राची चैतन्य शक्ती आहे, स्वातंत्र्य नैतिकतेची खाण आहे, अशा या स्वातंत्र्याची वैशिष्ट्ये सावरकरांनी स्वतंत्रतेच्या स्तोत्रात गायली आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या सर्व गोष्टी आपण ध्यानात ठेवून राष्ट्राच्या उत्कर्षासाठी, संरक्षणासाठी आणि आपली सर्व क्षेत्रातली उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी अविरत झटले पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य, सम्राट अशोक, सम्राट विक्रम, सम्राट ललितादित्य, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, या आणि अशा भारत मातेच्या सुपुत्रांच्या पाऊलखुणांवरून वाटचाल करायची आहे.  प्राप्त परिस्थितीमध्येही आपल्याला आपल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी अखंड सावध राहिले पाहिजे. जगातल्या कोणत्याही शक्तीचे दडपण आपल्यावर कधीही येता कामा नये. आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी आपणच आपल्या देशाचे वाली आहोत. म्हणून सावरकर आपल्याला प्रेरणा देताना म्हणतात…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.