अस्वस्थ पवार आहेत; फडणवीस नाहीत

भूतपूर्व मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांची कारण असो बहुधा नसोच पण टिंगल करण्याची एकही संधी विश्वासघाताने पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले आणि कायमचे भावी पंतप्रधान असलेले शरद पवार सोडत नाहीत. अत्यंत अनुचित काम त्यांच्या हातून होत आहे. परंतु पवार फडणवीसांपेक्षा राजकारणात बरेच ज्येष्ठ आहेत. तो मान ठेवला जावा ह्या एका सत्प्रवृत्त कारणाने आणि पवारांकडून आपण कधी ना कधी उपकृत झालेलो असल्याने कशाला त्यांच्याविषयी खरेखुरे लिहा ह्या अपराधी भावनेने पत्रकार फडणवीसांवर अन्याय होऊ देतात. पण कधीतरी वेळ येतेच जेव्हा खरे काय ते सांगावे असे कोणाला तरी वाटतेच.

काय म्हणाले होते पवार?

सोमवार २५ एप्रिल दिवशी पुण्यात एका समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले , ” सत्ता येते आणि जाते. पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नसावे. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ दिसत आहेत. निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकले नाही ह्याची अस्वस्थता आहे. सगळेच काही माझ्यासारखे नसतात. माझे सरकार १९८० मध्ये विसर्जित केले. रात्री साडे बारा वाजता मुख्य सचिवांनी मला माहिती दिली. तीनचार मित्रांना बोलावून घरातील सामान आवरले. सकाळी सात वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्यादिवशी इंग्लंड आणि भारत ह्यांच्या क्रिकेटचा सामना होता. सकाळी दहा वाजता वानखेडे क्रीडांगणावर जाऊन तो सामना पाहण्याचा आनंद लुटला. “

(हेही वाचा – मनसेची सभा होणारच! बाळा नादंगावरकर औरंगाबादमध्ये दाखल)

पवारांनी अस्वस्थ होण्याचे कारणच नव्हते. कारण ते मुख्यमंत्रीपद त्यांचे नव्हतेच. तो चोरीचा माल होता. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यांची संघटना काँग्रेस आणि नाशिकराव तिरपुड्यांची इंदिरा काँग्रेस ह्यांनी मिळून सरकार बनविले होते. पवार त्या संयुक्त मंत्रिमंडळात मंत्री होते. तिरपुडे गृहमंत्री होते. त्यांचे पवारांवर बारीक लक्ष होते. ते दगाबाजी करतील ; सगळ्यांना गाफील ठेवून मंत्रिपद आणि पक्ष सोडतील आणि जनता पक्षाच्या सहकार्याने सरकार बनवून स्वतः मुख्यमंत्री होतील अशी त्यांच्याकडे गुप्त पोलिसांकडून माहिती जमा झाली होती. त्याप्रमाणे ते वसंतदादांना सावध करत होते. पण , ‘ शरद माझ्या मुलासारखा आहे, तो माझा विश्वासघात कधी करणार नाही ‘, असे छातीठोकपणे सांगून दादा त्यांना परतवून लावीत असत. प्रत्यक्षात घडले असे की विधानसभा चालू असताना पवारांनी मंत्रिपदाचे त्यागपत्र दिले, काही आमदार बरोबर घेऊन काँग्रेस पक्ष सोडला आणि एसेम जोशींच्या सहकार्याने जनता पक्षाचे सरकार आपल्या नेतृत्वाखाली बनविले. पुढे अडीच वर्षांनी केंद्रात जनता पक्षाचा पराभव झाला. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. त्यांनी विश्वासघाताची शिक्षा म्हणून पवारांचे महाराष्ट्रातील सरकार विसर्जित केले. चोरीचा माल ज्याचा होता त्याच्याकडे परत गेला. चोरीचा माल काढून घेतला म्हणून चोर अस्वस्थ होत नाही. कारण आपण जे उपभोगतो आहोत ते दुसऱ्याचे आहे ह्याची त्यांला जाणीव असते. तो शांतपणे दुसऱ्या दरोड्याचे मनसुबे रचू लागतो. पवार निवडून आले काँग्रेसच्या तिकिटावर. काँग्रेसने त्यांच्यावर कसलाही अन्याय केलेला नव्हता. मंत्रिपद देऊन त्यांचा मान केला होता आणि विश्वास टाकला होता. आपल्या पक्षाच्या आमदारांचा आणि पक्ष श्रेष्ठींचा विश्वास संपादन करून पुढे त्यांना शिष्टसंमत राजमार्गाने मुख्यमंत्री होता आले असते. पण त्यांना घाई झाली होती. सत्तेचे लाभ किती अमर्याद असतात ह्याची त्यांना प्रत्यक्षानुभवातून कल्पना आली होती. त्यांना चटक लागली होती. कोणत्याही मार्गाने त्यांना मुख्यमंत्री व्हावयाचे होते. सगळी सत्ता आपल्या हातात एकवटायची होती.

माणसाला सत्ता का हवी असते?

माणसाला सत्ता का हवी असते? आमदाराला मुख्यमंत्री का व्हावयाचे असते ? कारण त्याला राजस वृत्तीने लोकांची सेवा करून त्यांचे जीवन भौतिक दृष्ट्या उंचावयाचे असते. त्यामागे त्याचा आणि त्याच्या पक्षाचा विशिष्ट विचार असतो आणि तो विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्यक्रम असतो.आपल्यालाच नैतिकतेचे पाठबळ अधिक आहे असा प्रत्येक पक्षाचा दावा असतो. पवारांची राजस वृत्ती,विचार आणि कार्यक्रम ह्यावर थोडा प्रकाश टाकता येतो का ते पाहू. नैतिकताही तपासण्याचे धाडस करू. पवारांची भू वास्तविकता अशी आहे की ते जरी चार वेळा मुख्यमंत्री झाले असले तरी एकदाही स्वबळावर झालेले नाहीत. त्यांना विचाराने आणि कार्यक्रमाने दुसरे असलेल्यांचे सहकार्य घ्यावे लागले. ते प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे जेमतेम पन्नासच्या आसपास एव्हढेच आमदार निवडून आणू शकले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. त्यांचा विचार आणि कार्यक्रम ह्यांचा जमाखर्च मांडला तर महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने तो फारच आतबट्ट्याचा झाला आहे असे काटेकोर तपासणीनंतर दिसून येईल.

…आणि लाचार महाराष्ट्र निर्माण केला

त्यांची मुख्य उपलब्धी म्हणजे भ्रष्टाचाराचे व्यवस्थापन शास्र त्यांनी अतिशय कौशल्याने निर्माण आणि विकसित केले. मुख्य म्हणजे त्यांनी नोकरशाही भ्रष्ट केली. उद्योग, व्यापार, साहित्य, पत्रकार, विचारवंत .शिक्षण अशा समाजावर ज्यांचा प्रभाव पडू शकतो आणि टिकू शकतो अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी माणसे विकत घेतली. त्यांना अनंत प्रकारे उपकृत आणि लाचार केले. नोकरशाही भ्रष्ट झाल्यामुळे ज्याच्या संमतीने भ्रष्ट व्यवहार करता आले त्याच्याविरुद्ध एकही पुरावा मागे ठेवला गेला नाही. कागदोपत्री पवार निष्कलंक राहिले. नियमांचा दंडुका घेऊन ज्यांनी पहारा करायचा आणि जो चुकला त्याच्याविरुद्ध शांत डोक्याने बोंबलत राहणे हा ज्यांचा धर्म असे प्रशासक आणि पत्रकार भ्रष्ट झाल्यामुळे पवार ‘ जाणता राजा ‘ ची बिरुदावली लावून बेमुर्वतपणे उजळ माथ्याने फिरू शकले. ब्राह्मणब्राह्मणेतर वादाने महाराष्ट्राचे गेल्या शंभर वर्षाचे राजकारण पुष्कळच काळवंडले आहे. ते पवारांना कमी करता आले असते. प्रत्यक्षात त्यांनी ते वाढवले आहे. त्यांनी मराठा जातीचे राजकारण केले असे म्हणावे तर आज मराठा जातीला रस्त्यावर उतरून जगण्यासाठीआरक्षण मागावे लागत आहे. म्हणजे पवारांनी नक्की कोणाचे भले केले हा प्रश्न उरतोच. त्यांनी पैशाचे राजकारण केले आणि लाचार महाराष्ट्र निर्माण केला. पवार मुख्यमंत्री असोत वा नसोत महाराष्ट्रावर सत्ता त्यांचीच चालत राहिली. त्यांनी निर्माण केलेल्या भ्रष्टाचाराच्या व्यवस्थापन शास्त्रानुसार मंत्रालय चालले आहे की नाही हे पाहणे इतकेच काम त्यांच्यासाठी शिल्लक राहिले आणि ते त्यांनी हसत हसत केले. त्यांना काही गमवायचे नसल्याने अस्वस्थ होण्याचा प्रसंग त्यांचेवर आला नाही.

पवारांविषयी राजकीय वर्तुळात विनोदाने असे म्हटले जाते की त्यांना भेटायला येणाऱ्या कोणत्याही माणसाला कितीला विकत घेता येईल ह्याची पहिल्या दहा मिनिटात ते अटकळ बांधतात. त्यांनी धारिका म्हणजे फाईल हातात घेतली की तात्काळ त्यातून राज्याला आणि आपल्याला किती आर्थिक लाभ होऊ शकतो ह्याची कल्पना त्यांना येते.

हिंदुत्वाच्या बदनामीने ते अस्वस्थ होणे साहजिक

पवार म्हणतात तसे फडणवीसांनी अस्वस्थ होणे साहजिक आहे. शिवसेनेच्या सहकार्याने त्यांनी सरकार बनवावे असा जनादेश त्यांनी मिळाला होता. शिवसेनेने ऐनवेळी मंगळसूत्र फेकून देऊन जो विलासात ठेवील असे वाटले त्याच्याबरोबर पळून जायचा निर्णय घेतला. त्यामुळे हिंदुत्व विचाराची दुष्कीर्ती झाली. फडणवीस हिंदुत्वाचे सच्चे पाईक असल्याने उद्धव ठाकरे ह्याने केलेल्या हिंदुत्वाच्या बदनामीने ते अस्वस्थ होणे साहजिक होते. भारताविषयी अनास्था असलेल्या कोठल्यातरी मिशनच्या आश्रयाने फडणवीसांचा मनोविकास झालेला नाही. ते संघाच्या शाखेवर लहानाचे मोठे झालेले आहेत. निरपेक्ष राष्ट्रसेवा हा त्यांचा प्रमुख जीवनोद्देश आहे. अजून दोनतीन पिढ्यांनी हारतुरे आणि मानपानाची अपेक्षा न करता हिंदुत्व विचार लोकमान्य आणि राजमान्य होण्यासाठी झटले पाहिजे हा सावरकरांनी सांगितलेला सावधानतेचा संदेश त्यांच्या जीवनशैलीला पैलू पाडून गेला आहे. फडणवीसांना निश्चित विचार आणि कार्यक्रम आहे. तो त्यांच्या पूर्वसुरींनी रक्त आणि घाम गाळून सिद्ध केला आहे. भारताला त्याच्या योग्यतेनुसार जागतिक राजकारणात महत्वाचे स्थान मिळाले पाहिजे. त्यासाठी मराठी तरुणांनी प्रत्येक क्षेत्रात अग्रभागी राहिले पाहिजे. शिक्षणात ओजस्वीपणा पाहिजे आणि सामाजिक वातावरण समतायुक्त समरसतेने भारलेले पाहिजे. सळसळते चैतन्य मराठी तरुणात संचारले पाहिजे ह्यासाठी भाजपच्या हाती सत्ता असायला हवी असे फडणवीसांना वाटते. त्यामुळे आपला काही दोष नसतांना कोणाच्यातरी छिनालपणामुळे आपल्याला सत्तावंचित राहावे लागले असे फडणवीसांना वाटले तर ते शतप्रतिशत लोकांच्या सहानुभूतीला आणि शुभेच्छांना पात्र आहेत.

महाराष्ट्राच्या गेल्या साठ वर्षाच्या राजकारणाचे तीन भाग पडतात. पहिल्या भागावर यशवंतराव चव्हाणांचे वर्चस्व आहे. मंत्रिमंडळ कसे बनवावे येथपासून ते दिल्लीत महाराष्ट्राची प्रतिमा प्रगल्भ राज्य म्हणून कशी निर्माण होईल ह्यासाठी त्यांनी अनेक स्तुत्य उपक्रम सुरु केले. शिवाजी महाराज हा त्यांचा आदर्श होता आणि नेहरूंची मर्जी सांभाळून त्यांना आपल्या दैवताची पूजाअर्चा करायची होती. ही तारेवरची कसरत त्यांनी निष्ठापूर्वक आणि पटाइतपणे केली. वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील ह्यांचे चव्हाणांशी सूर जुळलेले होते. जिल्ह्याजिल्ह्यातील योग्य तरुण निवडून आणि त्यांना प्रशिक्षित करून चव्हाणांनी खंबीर नेतृत्वाचा पाया घातला. पवार त्यातले एक. पण पवारांची निवड करून आपण फार मोठी चूक केली असे पश्चात्तापाचे उद्गार यशवंतरावांना पुढे काढावे लागले. पवारांच्या उमेदवारीच्या काळात त्यांचेवर लक्ष ठेवण्याची कामगिरी ज्यांच्यावर थोडीफार सोपविण्यात आली होती त्यांचेशी बोलतांना यशवंतरावांनी ही खंत व्यक्त केली.

म्हणून फडणवीसांना नाउमेद करण्याची संधी ते सोडत नाहीत

महाराष्ट्राच्या राजकारणाचा दुसरा भाग पवारांच्या नावावर लिहिला जाईल. ह्या भागात महाराष्ट्राची सद्सद्विवेकबुद्धी विकली गेली आणि तो लाचार झाला. तो पवारांना ‘ जाणता राजा ‘ म्हणून मुजरा करू लागला. ह्या भागात महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण गढूळ झाले. लोक गटागटात विभागले गेले. एकसंधता भंग पावली. पैसा दैवत झाले आणि लोक विचाराचे नाही तर पैशाचे राजकारण करू लागले. तिसरा भाग फडणवीसांनी लिहायला घेतला आहे. त्यांना निष्ठेचे आणि विकासाचे राजकारण करायचे आहे. आदर्श राज्यकारभार करण्याची त्यांची योग्यता आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरवात केली आणि पहिल्या काही दिवसात आपल्याला हव्या त्या शासकीय नेमणुका पवारांनी करून घेतल्या. फडणवीसांच्या ते लक्षात आले आणि पवारांचा प्रभाव आपल्या कारभारावर पडणार नाही ह्याची घेता येईल तेव्हढी काळजी घेऊन त्यांनी पाच वर्षे राज्यशकट समर्थपणे हाकला. पवार मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या काळातील त्यांचा कमीतकमी प्रभाव असलेले पहिले सरकार फडणवीसांचे आहे. ही उपलब्धी फार मोठी आहे. ती समजण्याइतकी प्रगल्भता उद्धव ठाकरे ह्यांच्याकडे नाही ही तेव्हढीच मोठी शोकांतिका आहे. पाच वर्षात फडणवीस सतत काम करीत राहिले – लोकांचा विश्वास संपादन करीत राहिले. जातीपातीचे नाही तर पानिपतावर ज्याची एक लाख बांगडी फुटली आहे अशा मराठी माणसाच्या हिताचे राजकारण त्यांनी केले. ते तरुण आणि प्रौढप्रताप वाटले. फडणवीस राजकारणात सुस्थिर आणि यशस्वी झाले तर लोक पवारांचे खरेखुरे मूल्यमापन करायला बसतील आणि त्यांना विसरतील ही पवारांना भीती आहे. म्हणून फडणवीसांना नाउमेद करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

– अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here