दहावी बारावीची परीक्षा आता संपत आली असून दहावीचा सोमवारी तर बारावीच्या विद्यार्थ्यांचा ७ एप्रिलला शेवटचा पेपर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत दोन्ही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर होतील, असे नियोजन बोर्डाकडून करण्यात आले आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. पण, बोर्डाकडून आता राखीव १२ हजार शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे, कोरोनाचे संकट डोक्यावर असतानाही आणि बहुतेक दिवस शाळा, महाविद्यालये बंद असतानाही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीपणे पार पडत आहे.
यंदा दहावी व बारावीचा निकाल १०० टक्के लागणार
यंदा तब्बल ३१ लाख २७ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कॉपी करून पेपर लिहिण्याचे प्रमाण ६० टक्यांनी कमी आढळले. विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच शाळेत झाल्याने हा बदल पाहायला मिळाला. कोरोनामुळे परीक्षेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढू नये म्हणून बोर्डाने शाळा तेथे केंद्र उपलब्ध करून दिले. त्यामुळे परीक्षेतील गैरहजेरी खूप कमी राहिली. दुसरीकडे ७५ टक्के अभ्यासक्रमांवर आधारित पेपर सोडविण्यासाठी अर्धा तास वाढवून देण्यात आला होता, त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही तणाव राहिला नाही.
(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांनी केले पुन्हा एकदा आवाहन)
कोरोनाचे संकट दूर झाले असून आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर निकाल वेळेत जाहीर करण्याची तयारी बोर्डाने सुरू केली आहे. दहावीच्या १६ लाख ४० लाख तर बारावीच्या १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यांचे पेपर तपासणीसाठी जवळपास ४० हजार शिक्षकांची मदत घेतली जात आहे. यंदा दहावी व बारावीचा निकाल १०० टक्के लागेल, असा विश्वास शाळा, महाविद्यालयांनी व्यक्त केला आहे.
पेपर तपासणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांचा नकार
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी नकार दिला आहे. शाळेला अनुदान देण्याची त्यांची मागणी आहे. त्यांची मागणी बोर्डाने शालेय शिक्षण विभागाला कळवली, पण त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. त्यांनी पेपर तपासणीसाठी नकार दिल्याने अनुदानित शाळांमधील राखीव शिक्षकांची मदत घेतली जात असून त्या शिक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत. एका शिक्षकास २०० ते २५० पेपर तपासणीसाठी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community