देशातील कोणत्याही भागात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असेल, तर तेथील पीडितांना न्याय देणे शक्य व्हावे, याकरता आता दिल्लीस्थित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देशभरातील राज्यांमध्ये विशेष वार्ताहरांची निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांकरता माजी पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील जनतेला मानवाधिकारासंबंधी न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
– प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक.
(हेही वाचा अंतर्गत सुरक्षांसमोरील आव्हाने…)
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने विशेष वार्ताहरांकरता नवीन नियमावली बनवली आहे. त्यामध्ये या विशेष वार्ताहरांची काय जबाबदारी असणार, यावर विस्तृत विवरण करण्यात आले आहे. दिल्लीस्थित राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला एकाच ठिकाणाहून देशभरातील विविध राज्यांत मानवाधिकारांविषयी प्रबोधन करणे, जेथे मानवाधिकारांचे उल्लंघन होते तिथे त्यांचे रक्षण करणे या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य होत आहे. म्हणून आयोगाने याकरता देशभरातील राज्यांमध्ये विशेष वार्ताहर म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून आयोग देशभर कार्यरत राहू शकणार आहे.
महाराष्ट्र, गोवा राज्याची जबाबदारी प्रवीण दीक्षित यांच्याकडे!
महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांसाठी विशेष वार्ताहर म्हणून माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण दीक्षित हे या दोन राज्यांत होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनावर प्रबोधनाचे काम करणार आहेत. तसेच जेथे मानवाधिकाराचे हनन होते, तिथे मानवाधिकारांचे रक्षण करणार आहेत.
Join Our WhatsApp Community