बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना सोमवारी सकाळी महसूल अधिकाऱ्यांनी डोंबिवली, कोपर, मुंब्रा खाडीत पकडले. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली, मुंब्रा, कल्याण, भिवंडीजवळ खाडीत दिवस रात्र बेकायदेशीर वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू माफियांच्या उपसा बोटी, सक्शन पंप अशी सुमारे ३० लाखांहून अधिक किंमतीचे साहित्य गॅस कटरने तोडून नष्ट करण्यात आले. यावेळी कारवाई होणार हे लक्षात येताच बोटीवरून उड्या मारून १० हून अधिक जण पळाल्याची माहिती मिळते आहे.
खाडीत रंगले थरारक नाट्य
कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख, रेती गट विभागाचे ठाणे प्रमुख महेश भोईर यांनी वाळू माफियांवरील कारवाईविषयी गुप्तता ठेवली होती. बोटीतून माफियांचा पाठलाग करुन त्यांना पकडायचे अशी तयारी देशमुख यांनी केली होती. कारवाईसाठी पाच पथके होती. सोमवारी सकाळी तहसीलदार देशमुख, रेती गटाचे भोईर, डोंबिवलीचे मंडल अधिकारी दिपक गायकवाड, तलाठी यांचा ताफा जेसीबी, गॅस कटर सामग्रीसह कोपर, डोंबिवली, रेतीबंदर, गणेश नगर, अंजुर दिवे खाडीकिनारी पोहोचले त्यावेळी खाडीमध्ये वाळू उपसा जोरात सुरू होता.
(हेही वाचा – कोरोना काळात दाखल झालेले गुन्हे घेणार मागे)
…आणि माफियांनी उपसा बोटीतून उड्या मारल्या
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या बोटीच्या दिशेने बोटीतून प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान, कारवाई पथक वाळू माफियांच्या दिशेने जात असताना त्याच्या लक्षात येताच त्यांनी उपसा बोटीतून उड्या मारल्या आणि खाडीच्या दिशेने पळ काढत ते फरार झाले. यावेळी कारवाईसाठी नेलेल्या बोटीतील तहसीलदार देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी माफियांच्या बोटीत प्रवेश केला. उपसा बोटीची गती कमी करून त्यामधली यंत्रसामुग्री गॅस कटरने तोडून टाकली, बोटीचे फाळके गॅस कटरने तोडून टाकले. अशी एकेक करून १० वाळू उपसा बोटी अधिकाऱ्यांनी खाडीत बुडवल्या. खाडीकिनारचे २० हून अधिक वाळू साठवण हौद जेसीबीने तोडून टाकण्यात आले.
Join Our WhatsApp Community