मेट्रो-३ च्या मूळ खर्चात १० हजार कोटींची वाढ

72

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी होता, तो आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख इतका होईल. प्रकल्पाच्या वाढीव खर्चात केंद्र शासनाचा सहभाग मिळण्याकरिता विनंती केली जाणार आहे.

सुधारित आराखड्यानुसार राज्य शासनाच्या हिश्याची रक्कम २ हजार ४०२ कोटी ७ लाखांवरून ३हजार ६९९ कोटी ८१ लाख इतकी होत आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी १ हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात प्राधिकरणाला निर्देश देण्यात आले आहेत. या सुधारित वित्तीय आराखड्यानुसार, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे (जायका) कर्ज १३ हजार २३५ कोटीवरुन १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख इतके झाले असून, वाढीव रक्कमेचे कर्ज घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.

बोगद्यांचे ९८.६ टक्के काम पूर्ण

मुंबई मेट्रो मार्ग-३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून, हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून, वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरु झाल्यानंतर नरिमन पाँईट, वरळी, वांद्रे कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतर ५० मिनिटात करणे सहज शक्य होणार आहे.

(हेही वाचा – FASTag महागणार? काय आहे कारण?)

सध्या बोगद्यांचे ९८.६ टक्के काम झाले असून, भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर शासकीय जमिन व २.५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.