देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पहिल्यांदाच सुरु असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या सॅटलाईट प्रयोगातून पुन्हा एक नवा उलगडा समोर आला आहे. राज्याच्या किनारपट्टीवर अंडी द्यायला येणा-या मादी ऑलिव्ह रिडले कासवांवर सॅटलाईट टॅगिंगचा प्रयोग करणा-या वनविभागाच्या कांदळवन कक्षाने तसेच देहरादून येथील केंद्राच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांना चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांपैकी एक स्थलांतरित असल्याचे दिसून आले. रेवा नावाची कासव राज्याच्या किनारपट्टीला अंडी घालण्यासाठी वर्षातून एकदाच भेट देत असल्याचे आता निष्प्न्न झाले आहे. त्यामुळे तिला स्थलांतरित कासव असे संबोधले जात आहे.
समुद्रातील सर्वाधिक अंतर कापणारी ऑलिव्ह रिडले
रेवा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने फेब्रुवारी महिन्यात गुहागरच्या समुद्रकिना-याला अंडी घालण्यासाठी भेट दिली होती. त्यानंतर रेवा सातत्याने दक्षिणेकडील समुद्रात जात असल्याचे दिसून येत होते. ही एकच कासव सरळमार्गी दक्षिण दिशेला प्रवास करत आहे. आतापर्यंत रेवाने ६५० किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण केला आहे. रेवा ही एकमेव आतापर्यंत समुद्रातील सर्वात जास्त अंतर कापणारी ऑलिव्ह रिडले कासव ठरली आहे.
इतर ऑलिव्ह रिडले कासवांबाबत
- प्रथमा – रेवापाठोपाठ प्रथमाने सर्वात जास्त समुद्रातील अंतर कापले आहे. प्रथमाने आतापर्यंत थेट खोल समुद्राचा रस्ता धरत ५५० किलोमीटर अंतर कापले. प्रथमा सध्या वेरावळ समुद्रकिना-यापासून १०० किलोमीटर लांब असल्याचे दिसून आले आहे.
- सावनी – सावनीने गेल्या पंधरवड्यापूर्वी नवी मुंबईपर्यंत मजल मारली होती. मात्र तिचा गेल्या १५ दिवसांपासून दक्षिण समुद्राच्या दिशेने प्रवास सुरु आहे. ती अंजर्ली समुद्रकिना-यापासून १०० किलोमीटर आत आहे.
- वनश्री – वनश्री सुरुवातीपासून समुद्रकिना-याजवळच घुटमळत आहे. ती सध्या दक्षिणेकडील बाजूस सरकत आता सिंधुदुर्ग किनारपट्टीपासून १०० किलोमीटर आत दिसून येत आहे.
रेवा पुढच्या वर्षी अंडी घालण्यासाठी राज्याच्या किनारपट्टीला भेट देणार
रेवा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा भ्रमणमार्ग सुरुवातीपासूनच ठरलेला आहे. ती एकमार्गी सरळ दक्षिणेकडील समुद्राचा प्रवास करत आहे. ती स्थलांतरित ऑलिव्ह रिडले कासव आहे. रेवा थेट पुढील वर्षांत अंडी घालण्यासाठी राज्याच्या किनारपट्टीला भेट देईल, असे ऑलिव्ह रिडले सॅटलाईट टॅगिंग आणि शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था, देहरादून येथील प्रकल्पप्रमुख सुरेशकुमार यांनी सांगितले.
जाणून घ्या समुद्रातील कासवांचे जमिनीशी असलेले नाते
कासवांचे जमिनीशी असलेल्या नात्याचे दोन विभागांत वर्गीकरण केले जाते. एक स्थलांतरित कासव म्हणून ओळखला जातो. स्थलांतरित कासव समुद्रकिना-याला अंडी घातल्यानंतर थेट निघून जातो. तो नजीकच्या भागांत ताटकळत नाही. त्याचा परतण्याचा मार्ग ठरलेला असतो.
(हेही वाचा – घोरपडीवर बलात्कार करणारा विकृत नराधम मोकाट)
दुस-या वर्गवारीत स्थानिक कासव मोडले जातात. हे कासव समुद्रकिना-यावर अंडी घातल्यानंतर फारसे दूर खोल समुद्रात जात नाहीत. स्थानिक कासव जवळपासच्या समुद्रातच आढळून येतात. या प्रकारामध्ये सावनी आणि वनश्री या दोन मोडत असाव्यात, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. दोघींची स्थानिक वर्गवारीत खात्री करायची असेल तर पुढील वर्षाच्या विणीच्या हंगामापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. प्रथमा ही उत्तरेकडेच प्रयाण करत आहे. तिचा मार्ग कालांतराने दक्षिणेकडेच सरकेल, असाही अंदाज बांधला जात आहे.