मुंबईत मागील फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख वाढत असून मुंबईच्या शेजारील महापालिकांच्या हद्दीतही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबईतील वाढणाऱ्या रुग्ण संख्येबरोबर शेजारील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आदी महापालिकांच्या हद्दीतही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईतील वाढणारी रुग्ण संख्या ही शेजारच्या महापालिकांसाठी चिंतेची बाब ठरताना दिसत आहे.
मागील पंधरा दिवसांमध्येच रुग्ण संख्येत दुपटीने वाढ!
मुंबईत मागील एक मार्चपासून आतापर्यंत रुग्णांची आकडेवारी दुपटीने वाढू लागली आहे. एक मार्च रोजी मुंबईत रुग्णांची संख्या १,०५१ एवढी होती. परंतु १७ मार्च रोजी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णांची संख्या २,३७७ एवढी झाली आहे. तर १ मार्च रोजी रुग्ण वाढीचा दर ०.२८ एवढा होता, परंतु १७ मार्च रोजी रुग्णवाढीचा दर ०.४८ एवढा झाला आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांमध्येच रुग्णांची संख्या दुपटीने वाढल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असतानाच याचा परिणाम आसपासच्या शहरांमध्येही दिसू लागला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या तीन महापालिकांच्या हद्दीतही मागील पंधरा दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. १ मार्च रोजी ठाण्यात ९१, ठाणे महापालिका हद्दीत १४०, नवी मुंबईत १५०, कल्याण डोंबिवलीत १८०, वसई विरारमध्ये ३० रुग्ण आढळून आले होते. तर १७ मार्च रोजी या ठाण्यात २३७, ठाणे महापालिका हद्दीत ५१६, नवी मुंबईत ३६७, कल्याण डोंबिवलीत ६३७, वसई विरारमध्ये ७४ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या सर्व महापालिकांच्या हद्दीमध्ये मागील पंधरा दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढलेली पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा : धारावीत पुन्हा जून, सप्टेंबरचा प्लॅशबॅक!)
मुंबईमुळे अन्य महापालिका क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कोरोना!
मुंबई महापालिकेसह अत्यावश्यक सेवांमधील कार्यरत कर्मचारी या सर्व महापालिकांच्या हद्दीमध्ये राहत असल्याने मुंबईमुळे या सर्व भागांमध्ये रुग्ण वाढत असल्याची बोंबाबोंब होत होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना स्थानिक भागातील लोकांकडून तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. यातील काही महापालिकांनी या कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्यावरही निर्बंध घातले होते. परंतु पुन्हा एकदा या मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबईत वाढणाऱ्या रुग्णांचा परिणाम हा या सर्व महापालिकांच्या हद्दीमध्ये दिसून येत आहे. या सर्व महापालिकांच्या हद्दीत राहणारे कर्मचारी हे मुंबई महापालिकेसह, मंत्रालय तसेच इतर सरकारी व निमसरकारी तसेच खासगी कार्यालयांमध्ये कार्यरत आहेत. कामाधंद्यांसाठी हे सर्व कर्मचारी मुंबईत येत असल्याने एकप्रकारे ते आता कोरोनाचे वाहक बनत असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत महापालिकेचे बरेच कर्मचारी कोरोनाचे रुग्ण बनले आहेत.
Join Our WhatsApp Community