तुमचं शहर बुडणार आहे… नासाने दिला धोक्याचा इशारा

मुंबई… भारताची आर्थिक राजधानी. जागतिक पातळीवर मुंबईला महत्त्व आहे. पण ही मुंबई काही वर्षांत बुडणार असल्याची धक्कादायक माहिती, अमेरिकेतील नासा संस्थेने केलेल्या अभ्यासात सांगितले आहे. येत्या काही वर्षांत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन, केवळ मुंबईच नाही तर मुंबईसह देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर असलेली 12 प्रमुख शहरं पाण्याखाली जाऊ शकतात, असा अंदाज आयपीसीसीने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करुन नासाने वर्तवला आहे. कोणती आहेत ती 12 शहरं?

काय आहे अहवाल?

जगभरातील वाढत्या समुद्र पातळीसोबतच हवामान बदलाचे विश्लेषण करण्यासाठी इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज(आयपीसीसी)ने अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात मानवी हस्तक्षेपांमुळे येत्या काही दशकांमध्ये होणा-या हवामान बदलांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयपीसीसीकडून दर पाच ते सात वर्षांनी जागतिक हवामान मूल्यमापन अहवाल प्रकाशित केला जातो. तापमान, पृथ्वीवरील बर्फाच्छादन, हरितगृह वायू उत्सर्जन(green house emmission) आणि समुद्राच्या पातळीचा अभ्यास करुन, हा अहवाल तयार करण्यात येतो. 1988 पासून आतापर्यंत असे सहा वेळा जागतिक विज्ञान मूल्यांकन करण्यात आले आहे.

(हेही वाचाः २०२१ वर्ष जागतिक तापमान वाढीचा उच्चांक मोडणार! )

समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा धोका

आयपीसीसीच्या डेटाचा वापर करुन, नासाच्या सी लेव्हल चेंज टीमने भविष्यात होणा-या समुद्र पातळीतील वाढीची माहिती गोळा करण्यासाठी एक उपकरण तयार केले आहे. यात उपग्रहांद्वारे मिळणा-या माहितीचा वापर समुद्रसपाटीचा अंदाज लावण्यासाठी वापरला आहे. या अहवालात 21व्या शतकाच्या शेवटापर्यंत मुंबईसह देशातील 12 शहरे पाण्याखाली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या शहरांना धोका

नासाने केलेल्या विश्लेषणानुसार, कांडला, ओखा, भावनगर, मुंबई, मार्मुगाव, मॅंगलोर, कोची, पॅरादीप, खिडिरपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि तुतीकोरीन या शहरांमधील समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे या शहरांमधील सखल भाग संपूर्णपणे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.

(हेही वाचाः वनात राहू शकत नाही, तर परिसर वन्य सदृश्य करूया! )

हरितगृह वायूचे उत्सर्जन

हरितगृह वायूचे उत्सर्जन रोखले नाही, तर पुढील दोन दशकांत पृथ्वीचे तापमान 1.5 अंश सेल्सिअसने वाढू शकते, असा इशारा आयपीसीसीने आपल्या अहवालात दिला आहे. हरितगृह वायूचे उत्सर्जन थांबवणे गरजेचे आसल्याचे सांगण्यात आले आहे, त्याशिवाय तापमानवाढ थांबणार नाही, असे आयपीसीसीच्या हवामान बदलावरील अहवालात सांगण्यात आले आहे.

म्हणून वाढत आहेत नैसर्गिक आपत्ती

जीवाश्म इंधनावरील माणसाची अवलंबिता वाढली आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. यामुळेच दुष्काळ, जंगलातील वणवा, महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 21व्या शतकाअखेरीस पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे आयपीसीसीच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः महापुरात दुर्लक्षित झालेलं एक गाव)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here