राज्यभर लम्पीचा कहर! या आजारावरील सर्व लसी मोफत, पशूसंवर्धन खात्याचा निर्णय

167

राज्यातील वाढत्या लम्पी व्हायरसमुळे ४३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार १५६ जनावरांना या व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती पशूसंवर्धन खात्याकडून देण्यात आली आहे. जळगाव, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातील जनावरांना सर्वाधिक धोका आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. हेच लक्षात घेता या रोगावरील सर्व लसी मोफत देण्याचा निर्णय पशूसंवर्धन खात्याकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात या रोगाची लागण झाल्याची माहिती असल्यास शासकीय रूग्णालयांना कळवण्याच्या सुचनाही शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – अमरावती मनपा आयुक्त शाईफेक प्रकरणाचा तपास आता CID कडे, गृहमंत्री फडणवीसांचे आदेश)

लम्पी व्हायरससंदर्भात आज, मंगळवारी पुण्यात पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लम्पी आजाराशी संबंधित शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांबद्दल माहिती दिली आहे. सचिंद्र सिंह यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, लम्पी व्हायरसने आतापर्यंत २ हजार ६६४ जनावरे संक्रमित झाले आहे. यापैकी १ हजार ५२० जनावरे बरे देखील झाले आहे. तर कोणतं जनावर या आजाराने ग्रस्त असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात ५ किमीमधील जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. दरम्यान, राज्यात १६ लाखांहून अधिक लसी उपलब्ध आहेत, तर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार आहेत. पुढील आठवड्यात ५० लसी उपलब्ध होतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

मार्च २०२० मध्ये देखील राज्यात लम्पी या रोगाचे काही रूग्ण आढळून आले होते. त्यावेळी २ लाखांहून अधिक जनावरांना लागण झाली होती. त्यावेळी केवळ १८ जनावरांना जीव गमवावा लागला होता, अशी माहिती त्यांनी दिली. लम्पी रोग हा माणसांना होत नाही, तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही. त्याबरोबर म्हशीला हा आजार होत नाही. त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी फक्त गाय आणि बैलाला होता. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत बैल बाजार बंद राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.