खड्डयांसाठी चार तंत्रज्ञानानांचे रस्त्यांवर प्रात्यक्षिक : कोणते तंत्र ठरणार यशस्वी

मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात होणारे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने नवीन व प्रगत अभियांत्रिकी पद्धतींचा प्रायोगिक तत्त्वावर अवलंब केला आहे. एकूण चार प्रकारच्या या पद्धतींचे प्रात्यक्षिक शुक्रवारी करण्यात आले आहे. या चार पद्धतींपैकी ज्या पद्धती यशस्वीतेच्या निकषावर उतरतील, त्यांचा अवलंब महानगरपालिकेच्या वतीने आगामी काळात करण्यात येणार आहे.

मुंबई महानगरात मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तात्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सततचा जोरदार पाऊस आणि सोबतीला वाहतुकीचा ताण यामुळे कोल्डमिक्स सारख्या पारंपरिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही मर्यादा येत आहेत आणि खड्डे भरल्यानंतरही काही कालावधीत पुन्हा खड्डे तयार होतात. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी नुकताच विविध ठिकाणी रस्ते पाहणी दौरा केल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी नवीन आणि प्रगत स्वरुपाच्या अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश रस्ते विभागाला दिले होते. त्यानुसार, रॅपिड हार्डिंग काँक्रिट, एम ६० काँक्रिट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचा प्रायोगिक तत्त्वावर उपयोग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पूर्व मुक्त मार्गाच्या खाली दयाशंकर चौक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता तसेच आणिक-वडाळा मार्गावर भक्ती पार्क जंक्शन, अजमेरा जंक्शन या ठिकाणी ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी केली पाहणी केली. या चारही पद्धतीने खड्डे भरण्याच्या प्रात्यक्षिकाप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि रस्ते विभागाचे सहकारी अधिकारी उपस्थित होते.

चार पद्धतींचा प्रायोगिक तत्त्वावर उपयोग

जिओ पॉलिमर काँक्रिट : पद्धतीचा वापर सिमेंट काँक्रिट रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने करण्यात येतो. सिमेंट काँक्रिटचा रस्ता खराब झाला असेल तर संपूर्ण पृष्ठभाग न काढता खड्ड्यामध्ये जिओ पॉलिमर काँक्रिट भरले जाते आणि ते मूळ सिमेंट काँक्रिट समवेत एकजीव होते. विशेष म्हणजे या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येवू शकतो.

पेव्हर ब्लॉक : या पद्धतीने खड्डे भरताना भर पावसातही खड्डयांमध्ये पेव्हर ब्लॉक भरुन दुरुस्ती करता येते. पेव्हर ब्लॉक एकमेकांमध्ये सांधले जात असल्याने आणि ब्लॉक भरताना खड्ड्यांमध्ये समतल जागा करुन ब्लॉक अंथरण्यात येत असल्याने खड्डा योग्यरितीने भरतो आणि वाहतूक सुरळीत करता येते.

रॅपीड हार्डनिंग सिमेंट : या पद्धतीमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट खड्ड्यांमध्ये भरले जाते. सुमारे ६ तासात सिमेंट मजबूत होवूने रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होते.

एम-६० काँक्रिट : या पद्धतीमध्ये या प्रकारचे काँक्रिट मजबूत होण्यासाठी सुमारे ६ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, मुंबईसारख्या महानगरात इतका वेळ रस्ता वाहतुकीसाठी बंद राखणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून खड्ड्यांमध्ये एम-६० काँक्रिट भरल्यानंतर त्यावर अतिशय मजबूत अशी पोलादी फळी (स्टील प्लेट) अंथरण्यात येणार आहे. त्यामुळे खड्डेही भरले जातील आणि वाहतुकीसाठी रस्तादेखील लागलीच खुला करणे शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here