दरोड्यासाठी गुजरातमधून मुंबईत आले अन् सोने समजून पितळेचे दागिने लुटले

93

सोन्याचे दागिने लुटायला गेलेल्या टोळीच्या हाती पितळेचे दागिने लागल्याचा प्रकार भायखळा येथे उघडकीस आला आहे. या टोळीला पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपींनी वृद्ध महिलेच्या हातातील लुटलेल्या सोन्याच्या बांगड्या पितळ्याच्या असल्याचे उघडकीस आली. भायखळ्यातील ताडवाडी येथे ३ जानेवारी रोजी घडलेल्या लुटीच्या घटनेत पोलिसांनी २४ तासांत आरोपींना गुजरात राज्यातून अटक केली असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.

गुजरातहून लुटारू आले

मनाली रॉबिन बेडवेवाला (३१), राहुल सिंग नानक सिंग खंडेलवाल (२७), झाकीर अब्दुल लतिफ शेख (२७) आणि मो.रईस मो. रफिक शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही टोळी लाल बाजार, जुनी कोर्ट बिल्डिंग, भरूच, गुजरात येथे राहणारी आहे. मनाली ही महिला पूर्वी भायखळा ताडवाडी येथे नातेवाईकाकडे राहत होती, त्याच परिसरात राहणारी ७८ वर्षांची वृद्धा मिठीबाई मकवाना ही घरात एकटीच असते व तिच्याकडे भरपूर दागिने असल्याचे तिने आपल्या प्रियकराला सांगितले होते. प्रियकर राहुल आणि मनाली यांनी या वृद्धेला लुटण्याची योजना आखली होती. यासाठी त्याने आपल्या दोन मित्राची मदत घेतली. आखलेल्या योजनेप्रमाणे ही टोळी हजारो रुपये खर्च करून खाजगी मोटारीने गुजरात भरूच येथून ३ जानेवारी सकाळीच मुंबईत दाखल झाले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही टोळी ताडवाडीमध्ये दाखल झाली. मानली हिने बुरखा परिधान करून प्रियकराचे मित्र झाकीर आणि मो.रईस यांना या वृद्धेचे घर दाखवण्यासाठी त्याच्या सोबत गेली आणि प्रियकर राहुल हा मोटारीत बसून त्यांची वाट बघत थांबला होता. मनालीने दुरूनच या दोघांना या वृद्धेचे घर इशाऱ्याने दाखवून मोटारीत येऊन बसली, त्यानंतर या दोघांनी वृद्धेच्या घरात प्रवेश करून वृद्धेला मारहाण करून तिच्या हातातील बांगड्या काढून घरात इतर दागिने शोधले मात्र दागिने मिळाले नसल्यामुळे त्यांनी बांगड्या घेऊन तेथून पसार झाले होते.

(हेही वाचा वादग्रस्त बुल्ली बाई अ‍ॅप : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न)

सीसीटीव्ही फुटेजवरून अटक

या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मारहाणीत जखमी झालेल्या मिठीबाई या वृद्धेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दरोडेखोराचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरु केला. भायखळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास माने, पोउनि रुपेश पाटील, दत्तात्रय जाधव, खैरमाटे, पाटोळे आणि पथक यांनी दरोडेखोरांचा शोध घेतला असता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दरोडेखोराच्या मोटारीचा नंबर मिळाला. या नंबरवरून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेऊन चौघांना मोटारीसह गुजरात सीमेवर अटक केली. पोलिसांनी या चौघांना अटक करून त्याच्या जवळून लुटलेल्या बांगड्या हस्तगत केल्या. पोलिसांनी ज्या वेळी या बांगड्या तपासल्या असता त्या बांगड्या पितळेच्या असल्याचे व त्याची किंमत एका हजारच्या घरात असल्याचे समोर आले. ही गोष्ट जेव्हा लुटारूंना कळली त्या वेळी त्यांच्यवर डोक्यावर हात मारायची वेळ आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.