सासूने दुबई येथून पाठवलेली ४४ लाख रुपयांची रोकड हडप करण्यासाठी जावयाने रचलेला कट त्याच्याच अंगलट आल्याचा प्रकार समोर आला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांनी शस्त्राचा धाक दाखवून आपल्या जवळील रोकड लुटल्याची खोटी तक्रार देणाऱ्या जावयाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या जावयाने मालाड एका खोलीत लपवून ठेवलेली रोकड जप्त केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी दिली.
अमीन व्होरा (३०) असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. अमीन व्होरा हा अंधेरी पश्चिम येथील एका उच्चभ्रू सोसायटीत पत्नी आणि दोन मुलीसह राहण्यास आहे. अमीन व्होरा हा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतो, त्याचा प्रेम विवाह असून दक्षिण मुंबईत राहणारी त्याची सासू देखील इव्हेंटचे काम बघते, सासू सध्या दुबई येथे वास्तव्यास आहे. मुंबईत घर घेण्यासाठी सासूने बुधवारी एका अंगडिया कुरिअर सर्व्हिस मार्फत मुलीला ४४ लाख रुपये दुबई येथून पाठवले होते.
(हेही वाचा औरंगाबाद झाले अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर)
हे रक्कम अंगडियाकडून घेण्यासाठी अमीन हा वडिलांसह बुधवारी मोटारीने दक्षिण मुंबईत आला होता, सायंकाळी त्याने अंगडियाकडून ४४ लाख रुपयाची रक्कम घेऊन अंधेरी येथे जात निघाला होता, भायखळा येथील अग्निशमन दलाच्या कार्यालपासून काही अंतरावर दोन मोटारसायकल वरून आलेल्या चौघांनी त्याची मोटार अडवून त्याला शस्त्राचा धाक दाखवून रोकड लुटून पोबारा केला असल्याची तक्रार अमीन याने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दाखल केली. मुंबईत झालेल्या लुटीच्या घटनेमुळे एकाच खळबळ उडवून दिली होती, आग्रीपाडा पॊलिसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी तात्काळ गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पथकाला घटनास्थळी पाचारण करून परिसरातील सर्व सिसिटीव्ही फुटेज तपासले जात होते, तसेच घटनास्थळी राहणाऱ्याना या बाबत चौकशी केली मात्र या ठिकाणी अशीच कुठलीच घटना घडलेली नसून तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील कुठल्याही लुटीचा घटना कैद झालेली नसल्याचे समोर आले. दरम्यान पोलिसांनी तक्रारदार अमीन व्होरा यांच्याकडे उलटतपासणी सुरु केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
तक्रारदार हा खोटं बोलत असल्याचे पोलिसांनी ओळखले व त्याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने गुन्हयाची कबुली देत लुटीचा बनाव केल्याची माहिती पोलिसांना दिली. पत्नीला अद्दल घडविण्यासाठी आणि सासूचे पैसे हडप करण्यासाठी त्याने हा बनाव रचल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अमीन व्होरा विरुद्ध पैसे हडपण्यासाठी खोटा बनाव करून विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती योगेंद्र पाचे यांनी दिली. दरम्यान आरोपीने मालाड येथे दडवून ठेवलेली ४४ लाख रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पाचे यांनी दिली आहे.