RRB-NTPC निकालाविरोधात विद्यार्थी संतप्त अन् पेटवलं थेट रेल्वेचं इंजिन!

121

बिहारमध्ये, RRB आणि NTPC परीक्षेच्या निकालातील गैरप्रकारामुळे संतप्त विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे स्थानकांवर सतत गोंधळ घालत आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे मालमत्तेचेही नुकसान झाले असून याबाबत विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकांवर हिंसाचार आणि जाळपोळ करताना पकडले तर त्याला आयुष्यभर रेल्वेत नोकरी मिळणार नाही, असा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे. रेल्वे विभागातील RRB आणि NTPC, CBT परीक्षा एकच्या निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. या परीक्षेच्या निकाला विरोधात बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनमध्ये आग लावली.

विद्यार्थ्यांकडून दगडफेक

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली, . त्यानंतर लोको पायलट रवि कुमारनं इंजिनला इतर डब्यांपासून वेगळं केलं आणि त्यानंतर स्वत: चा जीव वाचवण्यासाठी इंजिनमधून उडी मारली. लोको पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचं इंजिन जळून खाक झाले आहे. सितामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलनावेळी काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. एएनआयनं जारी केलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस फायरिंग करताना दिसून येत आहेत तर विद्यार्थी दगडफेक करत असल्याचं दिसून आलं आहे.

(हेही वाचा – तुम्हाला माहीत आहे का प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी का असतो?)

…तर रेल्वेत नोकरी मिळणार नाही

रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेत नोकरी मिळवू इच्छित विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांत रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले आहे. रुळ उखडले असून त्यामुळे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जे विद्यार्थी रेल्वे स्थानकांवर हिंसाचार आणि तोडफोडीत सहभागी आहेत आणि त्यांची ओळख व्हिडिओमध्ये झाली आहे, त्यांना आयुष्यभर रेल्वेत नोकरी मिळणार नाही.

दुसऱ्या दिवशीही गोंधळ सुरू

बिहारमध्ये सोमवारपासून, संतप्त विद्यार्थ्यांनी RRB NTPC परीक्षा २०२१ च्या निकालात गोंधळाचा आरोप करत गोंधळ घातला आहे. सोमवारी संतप्त विद्यार्थ्यांनी पाटण्यातील राजेंद्र नगर रेल्वे स्थानक आणि आज आरा रेल्वे स्थानकावर धडक दिली आणि तासन्तास गाड्यांची वाहतूक विस्कळीत केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बक्सर, नवादा, हाजीपूर, सीतामढी आणि मोतिहारी रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.