छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेले हिंदुराष्ट्र असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरच्या कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्राच्या स्वत्वाची घोषणा केली होती व त्यातूनच हिंदवी साम्राज्याची स्थापना केली. शिवरायांनी सनातन प्राचीन मूल्ये जागृत केली. गोहत्या थांबविल्या आणि मातृभाषेत व्यवहार सुरू केले. नौदलाची स्थापना केली. त्यांनी जनतेला एकत्रित जोडले. देशाप्रति नाते ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. तसेच औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिराचा विध्वंस केल्यानंतर शिवरायांनी त्याला पत्र पाठवून सांगितले की, राज्यकर्त्यांनी धर्माच्या आधारावर प्रजेत भेदभाव करू नये. सर्वांना समानदृष्टीने लेखून त्यांच्याशी व्यवहार झाला पाहिजे. असे न घडल्यास मला तलवार घेऊन उत्तरेत यावे लागेल अशी ताकिद छत्रपतींनी दिली होती. आपली भाषा, संस्कृती आणि प्राचिन मूल्ये यांची जपणूक करत देशाला मातृभूमी मानणाऱ्या प्रत्येकाला स्वराज्यात स्थान आणि संरक्षण मिळाले होते. छत्रपतींचे हे स्वराज्य म्हणजेच संघाला अभिप्रेत असलेले हिंदुराष्ट्र असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले.
(हेही वाचा – शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ विकसित करावे – राज्यपाल रमेश बैस)
यावेळी राजकीय नेते आणि पक्ष यांना उद्देशून डॉ. भागवत म्हणाले की, राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा असणे गैर नाही. स्पर्धा म्हंटली की संघर्ष आलाच. परंतु, आपण काय करतो, काय बोलतो, कुठे आणि कसे बोलते याचे भान ठेवणे आवश्यक असते. राजकीय मतभेद आणि सत्तेच्या स्पर्धेला देखील मर्यादा हव्यात. आपल्या कृतीमुळे देशाचे नाव खराब होणार नाही इतका विवेक ठेवणे प्रत्येकाकडून अपेक्षित असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. यासोबतच धार्मिक विविधतेच्या अनुषंगाने भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले की, स्वतःची छोटीशी वेगळी ओळख जपण्यासाठी निर्थक अट्टाहास करणे योग्य नाही. देशात बाहेरून आलेल्या धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांचे पूर्वज देखील इथलेच होते ही वास्तविकता स्वीकारून संघर्षाला तिलंजली दिली पाहिजे असे आवाहन सरसंघचालकांनी केले. संघाची स्थापना झाल्यापासून म्हणजेच १९२५ पासून संघ निरंतर कार्य करतो आहे. संघाला कुणाकडून काहीही नको, कुठल्या गोष्टीचे श्रेय देखील नको. समाज स्वयंसेवकांसोबत कार्य करत आहे व त्यातून चांगल्या गोष्टी घडत आहेत. देशातील सर्व घटकांनी एकत्रपणे येऊन काम केले तर देश प्रगती करेल. त्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज असून याला इतर कुठलाही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की, संघकार्य हे राष्ट्रकार्य असून समाज आणि देशासाठी उदात्त आणि उन्नत असलेली प्रत्येक गोष्ट संघ व स्वयंसेवक करतात. देशातील साधू-संतांनी संघ कार्यात हातभार लावून देशाला परमवैभव मिळवून देण्यास मदत करावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community