‘…तरच भारत आत्मनिर्भर होईल’; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य

106

जगातील इतर देशांकडून मिळणारे चांगल्या गोष्टींचे ज्ञान आत्मसात केलेच पाहिजे. परंतु, भारताचे पुनरूत्थान करताना देशाचे मूलतत्त्व कायम ठेवावे लागेल. केवळ इतरांची नक्कल करून भारत आत्मनिर्भर बनणार नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर गुरुवारी आयोजित संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी वाराणसी येथील काशी महापीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, वर्गाचे सर्वाधिकारी दक्षिणामूर्ती, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर घोष प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. यावेळी सरसंघचालक म्हणाले की, गेल्या काही वर्षात जागतिक पटलावर भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताकडे जी-20 समूहाचे अध्यक्षपद येणे ही सामान्य बाब नाही. परंतु, ही सुरुवात आहे. आपल्याला अजून बराच मोठा प्रगतीचा टप्पा गाठायचा आहे. भारताला विश्वगुरू करायचे असेल तर संपूर्ण समाजाला एकत्रित यावे लागेल, असे डॉ.भागवत यांनी सांगितले. तसेच समाजात लोकांना व्यक्तिगत व सामाजिक शिस्तीचे पालन करावे लागेल. स्वतंत्र देशात शिस्तीचे पालन हीच देशभक्ती आहे. नागरिकांना हा माझा देश आहे या भावनेतूनच वागावे लागेल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरदेखील म्हणाले होते. संविधान व कायद्याचे पालन करायला हवे, असे आवाहन भागवत यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी म्हणाले की, आधुनिक काळात तरुणांचा व्यवहार बदलला आहे. मुलांवर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार होणे आवश्यक आहे. जे आईवडीलांची सेवा करू शकत नाहीत, ते देशाची सेवा करू शकणार नाहीत. संस्कारनिर्मितीसाठीच वीरशैव लिंगायत मंच संघासोबत काम करत आहे, असे प्रतिपादन महास्वामी यांनी केले.

( हेही वाचा: लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट; 4 व-हाड्यांचा मृत्यू तर 63 हून अधिक जण होरपळले )

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • केवळ शक्तिशाली लोकांचे ऐकले जाते त्यामुळे भारताने शक्तिसंपन्न व्हावे.
  • आमची शक्ती जगाला जिंकण्यासाठी नव्हे जोडण्यासाठी आहे.
  • भारताच्या प्राचिन परंपरा, पूर्वज आणि संस्कारांना जो आपले मानतो तो हिंदू आहे.
  • पूजा पद्धती, भाषा, कपडे भिन्न असले तर राष्ट्र कल्याणाचे उद्दिष्ट समान हवे.
  • संघ सर्वांनाच स्वयंसेवक मानतो. काही आज आहेत तर काही भविष्यात होतील.
  • सृष्टी मातृस्थानी असल्यामुळेच पृथ्वी, गाय, नदीला कृतज्ञतेतून आईचा दर्जा दिला आहे.
  • भारताच्या प्रगतीत बाधक शक्ती देशात भांडणे लावून आपली पोळी शेकतात.
  • सामाजिक समता केवळ बोलण्याने येत नसून त्यासाठी समाजात सद्भावना हवी.
  • कार्याचे श्रेय संघाचे नसून समाजाचे असते, समाज करतो म्हणून कामे होतात.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.