भारत सरकारच्या अधिकाराखाली तयार केलेली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे प्रसारित केलेली 10 रुपयांची नाणी कायदेशीर आहेत आणि ती सर्व व्यवहारांमध्ये वापरली जाऊ शकतात. पण गोवा राज्यात कोणताही व्यवहार करताना दहा रूपयांची नाणी स्वीकरली जात नसल्याचे समोर येत आहे. गोव्यात गेलेल्या एका पर्यटकाने त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे. गोव्यात वस्तु खरेदी करताना गोव्यातील बँका दहा रुपयाचे नाणे स्वीकारत नाहीत. त्यामुळे आम्ही दहा रुपयाचे नाणे घेणार नाही, असे दुकानदारांकडून सांगितले जात असून त्यांची मनमानी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
काय आला अनुभव?
गोवा राज्यातील म्हार्दोळ येथील महालसा देवीच्या देवळा जवळ असलेले आपुले आईस्क्रीम या दुकानात आईस्क्रीम खाल्ले. त्याचे बिल चुकते करताना दहा रुपयाचे नाणे दुकानदाराला दिले. त्याने ते नाणे घेण्यास नकार देताना सांगितले, “गोव्यातील बँका दहा रुपयाचे नाणे स्वीकारत नाहीत. त्यामुळे आम्ही दहा रुपयाचे नाणे घेणार नाही.”, असे दुर्गेश परुळकर यांना गोव्यातील एका दुकानदाराने सांगितले.
गोव्यातील बँकांना रिझर्व बँकेचे नियम लागू नाहीत?
याप्रकारानंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे की, रिझर्व बँकेचे नियम देशातील सर्व बँकांना लागू होतात. तरीसुद्धा गोव्यातील बँका दहा रुपयाचे नाणे स्वीकारत नाहीत. गोवा हे राज्य हिंदुस्तानचा अविभाज्य भाग आहे. देशातील इतर चलनी नोटा गोव्यात चालतात. मग दहा रुपयाचे नाणे तेवढे का चालत नाही? गोव्यातील बँकांना रिझर्व बँकेचे नियम लागू होत नाहीत का? बँकांना रिझर्व्ह बँकेने प्रमाणित केलेले चलन नाकारण्याचा अधिकार आहे का?
हा नेमका प्रकार काय?
पुढे त्यांनी असेही सांगितले की, गोव्यातील जनता ग्राहकाकडून दहा रुपयाचे नाणे स्वीकारत नाही. अशावेळी अत्यंत चुकीचा संदेश पसरतो. गोवा राज्य हे पर्यटन स्थळ आहे. विदेशातील अनेक पर्यटक तेथे येतात. त्यांच्यापैकी कोणी दहा रुपयाचे नाणे गोव्यातील दुकानदाराला दिले आणि त्यांनी ते नाकारले तर विदेशातील नागरिकांना कोणता संदेश जातो? याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. हा नेमका प्रकार काय आहे, ते कळले पाहिजे. त्याच बरोबर गोव्यामध्ये दहा रुपयाचे नाणे सर्वत्र स्वीकारले जाईल अशी व्यवस्था तातडीने करण्यात यावी अशी मागणी या पर्यटकाकडून केली जात आहे.
Join Our WhatsApp Community