लसीकरण केंद्रांवर ऑफलाईन नोंदणीसाठी का होते गर्दी? ही आहेत उत्तरे

लस घेणं जरी महत्त्वाचं असलं तरी गर्दी करुन ती मिळवण्यासाठी धडपड करणं, म्हणजे एकप्रकारे कोरोनाला आमंत्रणच आहे. पण ऑफलाईन नोंदणी करण्यामागे सुद्धा नागरिकांची काही कारणं आहेत.

एकमेकांची साधी चौकशी करताना सुद्धा सध्या प्रत्येक जण एकमेकांना एकच प्रश्न विचारतोय, ‘लस घेतली की नाही?’ कोरोनाच्या राक्षसाचा अंत करायचा असेल, तर सध्या तरी लस हा एकंच ‘रामबाण’ उपाय लोकांना दिसतोय. त्यामुळे प्रत्येकाची लवकरात लवकर लस घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. 18 वर्षांवरील सर्वांनाच आता लस मिळत असल्याने, सगळेच जण सध्या ‘लसवंत’ होण्यासाठी आतूर झाले आहेत. लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन हे पर्याय उपलब्ध आहेत. घरबसल्या लसीकरणासाठी नोंदणी करता यावी, यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. पण तरीही ऑफलाईन नोंदणी करुन लस घेणा-यांची संख्या जास्त असल्याचे पहायला मिळते. यामुळे लसीकरण केंद्रांवर खूप मोठी गर्दी उसळलेली दिसते. लस घेणं जरी महत्त्वाचं असलं तरी गर्दी करुन ती मिळवण्यासाठी धडपड करणं, म्हणजे एकप्रकारे कोरोनाला आमंत्रणच आहे. पण ऑफलाईन नोंदणी करण्यामागे सुद्धा नागरिकांची काही कारणं आहेत, हे समोर येत आहे.

का होते गर्दी?

ज्या केंद्रांवर केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाते, त्या ठिकाणीही लोकांची गर्दी वाढताना दिसते. यात ऑफलाईन नोंदणी करुन लस घेणा-यांची संख्या ही जास्त आहे. मुंबईत ऑफलाईन नोंदणी बंद करण्यात आली असली, तरी राज्यात इतर ठिकाणी ती सुरू आहे. त्यासाठी नागरिक पहाटे 4 वाजल्यापासून लसीकरण केंद्रांवर रांग लावत आहेत. त्यात लसींचा मर्यादित साठा व ऑनलाईन नोंदणीकृत आणि दुसरा डोस घेणा-या नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात असल्याने, रांगेत उभे राहूनही ऑफलाईन नोंदणी करणा-यांना निराश होऊन घरी परतावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण होते. ऑनलाईन नोंदणी न करण्याबाबत नागरिकांना विचारले असता, त्यांनी त्यामागची कारणे सांगितली आहेत.

(हेही वाचाः लसीकरणासाठी स्वत्रंत ॲप बनवायला परवानगी द्या! मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी )

म्हणून होते ऑफलाईन लसीकरणासाठी गर्दी

आपल्या विभागाच्या पिन कोडनुसार किंवा आपल्या जिल्ह्याची निवड करुन, को-विन पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करता येते. पण ही नोंदणी करताना विभागातील लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली असल्याचे दाखवण्यात येते. तसेच ज्या केंद्रांवर नोंदणी सुरू आहे ती केंद्र घारापासून लांबच्या अंतरावर असल्याने, नागरिक त्यांची निवड करत नाहीत. ऑनलाईन नोंदणीबाबत हा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिक ऑफलाईन लसीकरणासाठी जवळच्या केंद्रावर गर्दी करतात. पण तासन् तास रांगेत उभे राहूनही लसीरण होत नसल्याने केंद्रावर एकच गडबड आणि बाचाबाचीचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. जे आताच्या परिस्थितीत फार धोक्याचे आहे. पण आपला नाईलाज असल्याने आपल्याला रांगेत उभे राहावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुंबईत दुस-या डोससाठीही ऑनलाईन नोंदणी आवश्यक

लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने मुंबई महापालिकेने सर्व केंद्रांवर केवळ ऑनलाईन नोंदणी करणा-या नागरिकांनाचा लसीकरणासाठी प्रवेश देण्याचे ठरवले आहे. तसेच ज्या नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे त्यांनीही ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पण ऑनलाईन नोंदणी करताना लसीकरण केंद्र उपलब्ध नसल्याचे दाखवत असल्याने नागरिक संभ्रमात पडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील लसीकरण बंद असल्याने आता ते सुरळीत होईपर्यंत थोडासा त्रास सहन करावा लागेल. तसेच दुसरा डोस जितका उशिरा घेतला जाईल, तितकं चांगलं असल्याने नागरिकांनी घाबरुन जायची गरज नाही. लसीकरण पूर्ववत झाल्यावर आपल्याला ऑनलाईन नोंदणी करता येईल, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here