युद्धस्थितीच्या सावटाखाली युक्रेनने बुधवारी आपला ३१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. मात्र या आनंदाच्या क्षणी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र डागले. या हल्ल्यात २२ नागरीक ठार झाल्याची माहिती आहे. कीवमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात २२ नागरीक ठार झाले आणि पूर्व युक्रेनमध्ये एका प्रवासी ट्रेनला आग लागली.
हल्ल्याच्या आदल्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाकडून हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी रशियाने रेल्वे स्थानकावर हल्ला झाला.
रशियाला युक्रेनवर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यासाठी रशियाने जगातील अन्य देशांचा विरोध झुगारून युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे ९ हजारांहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ५ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
( हेही वाचा: टीईटी घोटाळ्यात शिक्षण अधिका-याच्याच मुलीचे नाव आल्याने खळबळ )
हजारो सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं निराधार
युक्रेनचे लष्कर प्रमुख जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितले की, अद्याप रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. झालुझनी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, युक्रेनमधील अनेक मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपलं आहे. त्यांची काळजी घेण्याची गरज आहे. तर सुमारे ९ हजार सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं निराधार झाली आहेत. अनेक मुलांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत.
युक्रेनमधील हजारांहून अधिक लहान मुलांचा मृत्यू
दरम्यान युनिसेफ म्हणजेच संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, युद्धामध्ये युक्रेनमधील सुमारे ९७२ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांन सांगितले की, लहान मुलांच्या मृत्यूचा हा आकडा संयुक्त राष्ट्राच्या माहितीच्या आधारे आहे. मात्र खरा आकडा याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community