‘युद्धस्य कथा रम्यः ।’ या संस्कृत वचनाची सार्थकता सध्या जगभरातील श्रोते आणि वाचक अनुभवत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने जगभर सध्या ‘हे युद्ध म्हणजे तिसर्या संभाव्य महायुद्धाची नांदी आहे का’, अशी चर्चा होत आहे. युद्धातील भारताची तटस्थ परराष्ट्रनीती आणि युक्रेनमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चालू असलेले ‘ऑपरेशन गंगा’ हे विषय भारतात सर्वत्र चर्चिले जात आहे. याच दोन मुद्यांचे संक्षिप्त विश्लेषण करणारा हा लेखनप्रपंच…
( हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धात भारतामध्ये स्वदेशी शिक्षणावर का सुरु झाली चर्चा? )
१. भारताची तटस्थ परराष्ट्रनीती आणि ‘ऑपरेशन गंगा’
रशिया-युक्रेन युद्धाच्या आरंभिक अवस्थेमध्ये जगातील अन्य देश कुणाच्या बाजूने पाठिंबा देतात आणि भारत कोणती भूमिका घेतो, याविषयी जगभरातील मुत्सद्दी चर्चा करत होते. युरो-अमेरिकी राष्ट्रे युक्रेनकडे सहानुभूतीने पाहात असतांना भारताने रशियाच्या बाजूने किंवा युक्रेनच्या बाजूने मत न देता तटस्थ रहात हा विषय संयुक्त राष्ट्रांत चर्चेला आणून चर्चेने हा वाद सोडवावा अशी भूमिका घेतली. त्यामुळे ब्रिटीश आणि अमेरिकी वृत्तपत्रांनी भारतावर वैचारिक हल्ले चढवले. जगभर असे वातावरण निर्माण केले जात होते की, भारताची परराष्ट्रनीती क्रूर आहे; परंतु भारत सरकार बधले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन येथे वास्तव्यास असलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक !
आता लाखांहून अधिक भारतीय आणि भारतीय विद्यार्थी रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये शिक्षण अथवा नोकरी-व्यवसायासाठी निवास करतात. युद्धात कुठल्याही एका देशाच्या बाजूने भूमिका घेणे म्हणजे तेथील भारतीय नागरिकांना असुरक्षित करण्यासारखे होते. भारताने तटस्थ भूमिका घेऊन रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद स्थापित केला, तो केवळ भारतीय सुरक्षितपणे युक्रेनमध्ये पोलंड, बेलारूस, रोमानिया या देशांच्या सीमा ओलांडू देण्यासाठी! रशियाने घोषित केले की भारतीय तिरंगा असलेल्या लोकसमूह आणि वाहनांवर रशियन सैन्य हल्ले करणार नाही. युक्रेनने जाहीर केले की, भारतीयांना पोलंड, बेलारूस, रोमानिया या देशांच्या सीमा रिकाम्या करण्यात येतील. पोलंड आणि रोमानिया येथे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून येणार्या भारतीय आणि विद्यार्थ्यांने स्थलांतर भारतात होण्यातील सर्वत्र समस्या सुटण्यासाठी आणि भारताचे चार केंद्रीय मंत्री पूर्णवेळ या देशांत आहेत. सर्व आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अडचणी सोडवून हे विद्यार्थी भारतात ‘ऑपरेशन गंगा’द्वारे भारतात पाठवले जात आहे.
विशेष म्हणजे प्रतिदिन १५०० अब्ज डॉलर एवढा खर्च युद्धाचा असतांना रशियाने खारकीव ताब्यात घेण्यापूर्वी ६ तास भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी दिले. आज अमेरिका-चीन-युरोपीय राष्ट्रे केवळ आर्थिक हितासाठी रशिया किंवा युक्रेनची बाजू घेत आहेत. युक्रेनमध्ये आजही अमेरिकी आणि युरोपीय वंशाचे लाखो नागरिक अडकून पडले आहेत; पण त्यांच्या जिवाची कोणालाही पर्वा नाही. दुसरीकडे भारतीय संस्कृती ‘अर्थ’ या कल्पनेपेक्षा ‘जीवन’ या संकल्पनेला अधिक महत्त्व देत असल्याने भारताने दाखवलेली व्यावहारिकता जगासमोर नवीन वस्तूपाठ घालत आहेत. जगभर भारतीय तिरंग्याचे वाढलेले मूल्य अनुभवले जात आहे. भारतीय तिरंगा असलेली वाहने सुरक्षितपणे युक्रेनमधून बाहेर पडत आहेत. भारताचे कट्टर विरोधक राहिलेले पाकिस्तान आणि तुर्कस्थानचे नागरिकही भारताच्या तिरंग्याच्या आसर्याखाली युक्रेनमधून स्थलांतरित होत आहे, हे अभूतपूर्व आहे.
२. युक्रेनचे थेट समर्थन नाकारणे हे व्यावहारिकदृष्ट्या योग्यच !
परराष्ट्रनीती भावनिक नसते, तर व्यावहारिक असते. आर्थिक आणि सामरिक हितसंबंध असणे, यावरच दोन देशांची मैत्री निश्चित होत असते. रशियाच्या आक्रमणामुळे ज्या युक्रेनसाठी जगभर सहानुभूतीची लाट आहे, त्या युक्रेनने भारताला किती वेळा साहाय्य केले, याचा ‘होमवर्क’ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आधीच करून ठेवला होता. जेव्हा संयुक्त राष्ट्रात काश्मीरमधील ३७० चा मुद्दा आला, तेव्हा युक्रेनने भारताच्या विरोधात मत मांडल. जेव्हा भारताने अणु चाचणी केली, तेव्हाही संयुक्त राष्ट्रात युक्रेनने भारताच्या विरुद्ध मत मांडले. भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्याचा मुद्दा आला तेव्हाही युक्रेनने विरोधी मत मांडले होते. युक्रेन भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तानला शस्त्र पुरवली. अणुउर्जेसाठी जेव्हा भारताला युरेनियमची आवश्यकता होती, तेव्हा युरेनियमचे भांडार असलेल्या युक्रेनने नकार दिला. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या युक्रेनची बाजू न घेणे, हे योग्यच होते.
३. रशियाशी कृतज्ञतेची फेड !
भारताच्या स्वातंत्र्यानंतर रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र राहिला, त्या वेळी युक्रेन जन्मालाही आला नव्हता. रशिया आणि युक्रेन यांमधील ‘स्लाव’ हा नागरी वंश एकच आहे. स्लाव नागरी भाषांमध्ये संस्कृत शब्द सर्वाधिक आहेत. रशियाने भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या १९६५ आणि १९७१ च्या युद्धात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत नकाराधिकार वापरून भारताचे समर्थन केले होते. ‘ब्रह्मोस’ हे शक्तीशाली क्षेपणास्त्र भारतात बनवले जाते, याचे एकमेव कारण रशियाचे भारतप्रेम ! मुळात युक्रेन हा रशियाचाच भाग आहे. येथील भाषा, संस्कृती हा रशियाची आहे. असे असताना युक्रेन रशियाच्या विरोधात जाऊन अमेरीकेच्या नादी लागून नाटोच्या मागे जात असेल, तर ही मातृभूमीशी प्रतरणा म्हणावी लागेल. नाटो देशांच्या सीमा आणि रशियाची सीमा यांच्यात युक्रेन म्हणजे ‘बफर स्टेट’ आहे. अशा वेळी युक्रेन जर नाटोमध्ये गेला तर नाटो पर्यायाने रशियाचा प्रतिस्पर्धी अमेरिका रशियाच्या सीमेवर पोहचणार आहे, अशा वेळी रशियाचा युद्धाचा निर्णय हा स्वसंरक्षणाचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की, आक्रमण हाच स्वरक्षणाचा सर्वोत्तम मार्ग आहे. भारताने सध्या रशियाविरोधी भूमिका न घेता रशियाने पूर्वापार केलेल्या साहाय्याची कृतज्ञतापूर्वक परतफेड केली आहे. भविष्यात तिसरे महायुद्ध होईल, तेव्हा भारताची परराष्ट्रनीती रशिया-चीन समर्थक असेल कि नाही, हे मात्र काळ ठरवील.
– चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
Join Our WhatsApp Community