रशिया युक्रेन युद्धाचा वंदे भारत सेमी हायस्पीड योजनेला फटका बसला आहे. या ट्रेनची चाके बनवण्याची युक्रेनला ऑर्डर दिली होती. पण युद्धामुळे ती ऑर्डर पूर्ण होऊ शकत नसल्याने, आता वंदे भारत ट्रेनला चाकांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
युद्धामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय
भारताचे 75 वे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने, भारत सरकारने अनेक महत्वकांक्षी प्रकल्प सुरु केले आहेत. त्यातलाच एक म्हणजे वंदे भारत प्रकल्प होय. येत्या वर्षभरात 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा सरकारचा मानस होता. त्यामुळेच या ट्रेनच्या चाकांसाठी युक्रेनला ऑर्डर देण्यात आली होती. परंतु, युद्धामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, युक्रेनला ही ऑर्डर पूर्ण करणे शक्य नाही. युक्रेनमधील एका कंपनीने भारताने ऑर्डर दिल्यानंतर 128 चाके तयार केली आहेत. आता ही चाके शेजारच्या रोमानियाला नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही चाके पुढील महिन्यात टेस्टींगसाठी विमानाने भारतात आणली जाणार आहेत.
( हेही वाचा: सावधान! तुम्ही ‘या’ देशातून शिक्षण घेताय? मग तुम्हाला मिळणार नाही नोकरी )
इतर देशांना देणार ऑर्डर
मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या अखेरीस देशातील प्रमुख मार्गांवर 75 सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, आता चेक रिपब्लिक, पोलंड आणि अमेरिकेला ऑर्डर देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी भारत चीनलाही ऑर्डर देऊ शकतो, असे सांगितले जात आहे.