नॅशनल पार्कमधील वाघाटीचा मृत्यू

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सहा महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या वाघाटीचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात तिला उद्यानात आणले गेले होते. आईपासून दूरावलेली काही दिवसांची ही वाघाटी नीरा नदीवर सापडल्याने तिचे निरा नाव ठेवले गेले. तिचा ३ जून रोजी मृत्यू झाला. उद्यानात नव्या वाघाटी संवर्धन केंद्राची उभारणी वेगाने होत असताना वाघाटींच्या संवर्धनात मात्र उद्यान प्रशासनाकडून कमतरता राहत असल्याची टीका वन्यजीव प्रेमींनी केली.

( हेही वाचा : राज्यात कोरोनाचे चार बळी)

उद्यान प्रशासनासमोर आव्हान

गेल्या पाच-सहा वर्षांपासून व्याघ्र सफारीतील पिंज-यानजीकच्या ३ हजार चौरस फूट जागेत वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र पहिल्यांदा उभारले गेले. वाघाटींच्या मिलनातून जन्मलेले पिल्लू जगवणे हे वनाधिका-यांसाठी आव्हान ठरले. मादीला मातृत्वाची नैसर्गिक जाणीव नसल्याने तिने पिल्ले खाऊन टाकले. त्यानंतर गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही या छोट्या केंद्रात पुण्यावरुन आलेल्या दोन चार महिन्यांच्या वाघाटी भाऊ-बहिणींचा मृत्यू झाला. नजीकच्या वाघाच्या पिंज-यातील डरकाळी असह्य झाल्याने नर पिल्लूचा घाबरुन मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली. भावाच्या मृत्यूने बहिणीने खाणेपिणे बंद केल्याने कालांतराने ती देखील मृत्यू पावली. त्याचदरम्यान तुळशी परिक्षेत्रातून आलेल्या दोन वाघाटींचाही कालांतराने मृत्यू झाल्याचे आढळले. आता उद्यानातील पिंज-यात रिद्धी आणि सिद्धी असे नर-मादी उरलेत. त्यांच्या मिलनातून जन्मलेल्या पिल्लाला सांभाळणेही उद्यान प्रशासनासमोर आव्हानच ठरेल.

येत्या दोन आठवड्यांत काकडभट्टी येथे नव्या वाघाटी संवर्धन केंद्राची उभारणी पूर्ण होईल, असे उद्यान प्रशासनाकडून कळवण्यात आले. १ हेक्टर जागेत देशभरातून वाघाटी आणून त्यांच्या प्रजननातून जन्मलेल्या पिल्लांचे संवर्धन करण्याचा प्रकल्प उद्यान प्रशासनाचा आहे.

३ जून रोजी  निराला सकाळी सहा वाजता फीट आल्याचे तिची निगराणी करणा-या कर्मचा-यांच्या लक्षात आले. ११ वाजता उपचारादरम्यान तिचा अपघाती मृत्यू झाला.
– विजय बारब्दे, अधीक्षक, व्याघ्र व सिंह सफारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here