तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे, याला पाठदुखीचा त्रास आहे. त्याला कारागृहात बसण्यासाठी खुर्ची आणि झोपण्यासाठी गादी मिळावी, अशी मागणी वाझेच्या वकिलांनी एनआयए न्यायालयात केली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.
काय आहे मागणी?
सचिन वाझे याच्या वकिलांनी एनआयए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सचिन वाझे याला पाठदुखीचा त्रास असल्यामुळे त्याला जमिनीवर बसता आणि झोपण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला कारागृहात बसण्यासाठी खुर्ची आणि झोपण्यासाठी गादी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली, दरम्यान दुसऱ्या अर्जात वाझेच्या वकिलांनी वाझेच्या दातावर उपचाराची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने कारागृह नियमानुसार, त्यांना वैद्यकिय उपचार मिळतील असे सांगितले.
मानेच्या कोठडीत वाढ
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने अटक केलेल्या पोलिस निरीक्षक सुनील माने याची बुधवारी एनआयए कोठडी संपली असल्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने सुनील माने याच्या एनआयए कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
म्हणून मनसुखचे शेवटचे लोकेशन वसई?
सुनील माने हा मनसुख हिरेन हत्या प्रकणात थेट सहभागी असल्याचे पुरावे, एनआयएच्या हाती लागले असून ४ मार्च रोजी सुनील माने हा सचिन वाझे सोबत मनसुखला भेटला होता. तसेच मनसुखचा मोबाईल फोन घेऊन सुनील माने आणि वाझे हे दोघे वसईला गेले. त्याठिकाणी काही वेळासाठी मनसुखचा फोन सुरू करुन, मनसुख हा वसईला गेल्याचे भासवत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, असे एनआयएच्या तपासात समोर येत असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community