मुकेश अंबानीच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कर ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन वाझे, हा सध्या न्यायालयीन कोठडीत तळोजा तुरुंगात आहे. त्याने वकिलामार्फत न्यायालयाकडे एक पेन, कोरे पेपर आणि कार्बन पेपरची मागणी केली होती. मात्र न्यायालायने त्याची ही मागणी फेटाळून लावली. एनआयएच्या कोठडीत असताना सचिन वाझेने तीन पानांचे पत्र लिहून, त्यात तत्कालीन गृहमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. आता वाझेला पुन्हा कागद आणि पेनची गरज का पडली? त्याला पुन्हा तुरुंगात बसून दुसरा लेटर बॉम्ब तर टाकायचा नव्हता ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय घडले न्यायालयात?
सचिन वाझे आणि रियाझुद्दीन काझी या दोघांना मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी केल्या प्रकरणात एनआयएने अटक केली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत असून, शुक्रवारी दोघांची न्यायालयीन कोठडी संपली आहे. त्यांना शुक्रवारी प्रत्यक्षात न्यायालयात हजर न करता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडी ५ मे पर्यंत वाढवली आहे. सचिन वाझेच्या वकिलांनी वाझे यांच्या मार्फत न्यायालयात अर्ज करुन पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषध मिळावी, यासाठी वाझेंच्या वकीलांमार्फत दुसरा अर्ज केला होता. मात्र प्रिस्कीप्शन नसल्याने सोबत प्रिस्कीप्शन जोडा, असा युक्तिवाद एनआयच्या वकिलांनी न्यायालयात केला. वाझेंनी दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळावे यासाठीही अर्ज केला होता, मात्र तोही न्यायालयाने फेटाळला आहे.
(हेही वाचाः सुनील मानेला २८ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी!)
कोणाची करायची आहे पोलखोल?
एनआयएच्या कोठडीत असताना सचिन वाझे याने न्यायालयाला लिहलेले तीन पानांचे पत्र न्यायालयात सादर न होताच व्हायरल झाले होते. त्या पत्रात वाझे याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलात पुन्हा घेण्यासाठी २ कोटींची मागणी केली होती, तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील त्यांनी वसुली करुन देण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. सध्या तळोजा तुरुंगात असलेला सचिन वाझे याला पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळवून आणखी कोणाची पोलखोल करायची आहे का? पुन्हा लेटर बॉम्ब फोडून राज्यात खळबळ उडवून देण्याचा विचार आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र न्यायालायने त्याचा अर्ज फेटाळून त्याला लिखाणाची सामुग्री देण्यास एक प्रकारे मनाई केली आहे.
(हेही वाचाः काय आहे वाझेने लिहिलेल्या पत्रात? मंत्र्यांवर केले कोणते आरोप? वाचा…)
Join Our WhatsApp Community