वाझेंचा मोबाईल, संगणक एनआयएकडून जप्त! सूत्रधाराचा शोध सुरु  

एनआयएच्या पथकाने मंगळवारी, १६ मार्च रोजी सीएसटीमधून मर्सडीझ गाडी ताब्यात घेतली. ही मर्सडीझ गाडी स्वतः सचिन वाझे वापरत होते, अनेक वेळा ती मुंबई पोलीस मुख्यालयात आढळून आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण आता एनआयएने हातात घेतले आहे. त्याचा तपास जोरदार सुरु आहे. एनआयए एकामागोएक खुलासे करत आहे. तसेच तपासाच्या अनुषंगाने मोठमोठ्या ठिकाणी हात घालत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सचिन वाझे पोलीस आयुक्तालयात कोणत्या ठिकाणी बसतात, त्या केबिनची एनआयएने झाडाझडती केली. त्यामधून एनआयएने सचिन वाझे यांचे मोबाईल आणि संगणक आणि अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्या माध्यमातून एनआयए आता अंबानी स्फोटक प्रकरणातील सूत्रधाराचा शोध घेत आहे.

७ पोलिसांची केली चौकशी! 

एनआयएने आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ७ जणांची चौकशी केली आहे. त्यातून एनआयएने या प्रकरणात कोणते धागेदोरे सापडत आहेत का, हे तपासत आहे. त्यातून महत्वाची माहिती हाती लागत आहे. दरम्यान वाझेंनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून त्याविषयी वरिष्ठांना कोणतीही माहिती दिली नाही. एनआयए सचिन वाझे यांचा सहकारी रियाझ काझी यांचीही चौकशी करत आहे, त्यांचाही या गुन्ह्यात समावेश आहे का, असा संशय एनआयएला आहे. कारण त्या स्फोटके भरलेल्या गाडीचे खोटे नंबर प्लेट आणि साकेत इमारतीतील cctv फुटेज काझी यांनीच मिळवले होते. तसेच या कोणत्याही गोष्टी रेकॉर्डवर आणल्या नाहीत.

(हेही वाचा : मुंबई पोलीस आयुक्त पदी कोण? रजनीश सेठ की सदानंद दाते?)

काय आहे गुपित ‘त्या’ तिसऱ्या मोटारीचे?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा उलगडा झाला, त्यापाठोपाठ स्कॉर्पिओच्या मागे उभी असलेल्या इनोव्हा गाडीचाही उलगडा झाल्यावर आता एनआयएच्या पथकाने आणखी एक मर्सडीझ गाडी सीएसटी परिसरातून जप्त केली आहे. या मर्सडीझ गाडीचे गौडबंगाल काय आहे?, एनआयएच्या पथकाने ती ताब्यात का घेतली? याबाबत लवकरच उलगडा होईल, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. एनआयएच्या पथकाने मंगळवारी, १६ मार्च रोजी दुपारी सीएसटी परिसरात एका वाहनतळावरून मर्सडीझ गाडी ताब्यात घेऊन एनआयएच्या कार्यालयात आणली. ही मर्सडीझ गाडी स्वतः सचिन वाझे वापरत असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. ही गाडी अनेक वेळा मुंबई पोलीस मुख्यालयात अनेकांना आढळून आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मर्सडीझ गाडीची नोंद नाही!   

मुंबई पोलिसांच्या मुख्यालत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद असणे गरजेचे असून देखील या मर्सडीझ गाडीची नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच ज्या दिवशी मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ या कारचे स्टेरिंग जाम झाले होते. त्या वेळी मनसुख यांनी ही कार विक्रोळी येथे उभी करून ओला, कॅबने ते क्रॉफर्ड मार्केट येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेचे त्यांनी लोकेशन बदलून कॅब चालकाला सीएसटी येथील शिवालय हॉटेल असे लोकेशन दिले होते. सूत्राच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी एक मर्सडीझ मोटार आली होती, त्यातून मनसुख हिरेन हे बसून पुढे गेले होते, ती मर्सडीझ मोटार म्हणजेच मंगळवारी एनआयएच्या पथकाने सीएसटी येथून ताब्यात घेतलेली मर्सडीझ मोटार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. यापूर्वी स्कॉर्पिओ मोटारीचे गुपित पुढे आले, त्यानंतर इनोव्हा मोटार एनआयएने पोलीस मुख्यालयातून ताब्यात घेतली, पोलिसांनी इनोव्हा चालकाची देखील ओळख पटवण्यात आली असल्याचे समजते. आता या गुन्ह्यात तिसऱ्या मोटारीची म्हणजेच मर्सडीझची एंट्री झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here