तब्बल १७ वर्षे पोलिस दलापासून दूर राहिल्यानंतर बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला पुन्हा एकदा पोलिस दलात हिरो बनायचे होते. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवण्यासाठी त्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया या आलिशान घराची निवड केली होती, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. स्वतःच स्फोटकांनी भरलेली मोटार अंबानी यांच्या घराजवळ ठेऊन स्वतःच गुन्ह्याची उकल करण्यासाठी वाझेने ‘जैश उल हिंद’ या कथित दहशतवादी संघटनेचा या सर्व प्रकरणामागे सहभाग असल्याची योजना आखली होती, असे देखील आरोप पत्रात म्हटले आहे.
वाझेचा ‘कार’नामा
सचिन वाझेने आपला जवळचा मित्र मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ कार स्वतःच्या ताब्यात घेऊन ती विक्रोळी येथून चोरीला गेल्याचा बनाव आखला. त्यासाठी त्याने विक्रोळी पोलिस ठाण्यात चोरीची खोटी तक्रार देण्यास मनसुख हिरेनला भाग पाडले होते. २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सचिन वाझेने स्वतःहून ही मोटार चालवत अंटालिया परिसरात उभी केली. त्यात त्याने जिलेटीन कांड्या आणि मुकेश अंबानी यांच्या नावाचा उल्लेख करुन धमकीची एक चिठ्ठी सोडली होती.
(हेही वाचाः वाझेने न्यायालयात ‘जे’ सांगितले त्यामुळे वातावरण झाले गंभीर… असं काय म्हणाला वाझे?)
जैश उल हिंदचे लेटर हेड
२५ फेब्रुवारी रोजी ही स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार गावदेवी पोलिसांना सापडल्यानंतर या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटकडे सोपवण्यात आला होता. सीआययू युनिटचे तत्कालीन प्रभारी अधिकारी म्हणून सचिन वाझे हा होता. हे कृत्य ‘जैश उल हिंद’ या अतिरेकी संघटनेचे असल्याचे वाझेने भासवले होते. त्यासाठी त्याने जैश उल हिंद संघटनेचे लेटर हेड तयार केले होते.
स्वतःचा बचाव करण्यासाठी मनसुखचा दिला बळी?
स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेनचा शोध घेण्यात आल्यानंतर त्याला चौकशीसाठी सीआययू कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यावेळी हिरेन याने स्कॉर्पिओ विक्रोळी येथून चोरीला गेली होती व या प्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आणि माध्यमांना दिली होती. अंटालिया जवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्यानंतर उडालेल्या गोंधलामुळे हे प्रकरण आपल्या अंगलट येतंय की काय, असे वाझेला वाटले होते. त्यानंतर त्याने मनसुख हिरेनला स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेण्यास सुचवले होते. परंतु मनसुख जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे वाझेने स्वतःचा बचाव करण्यासाठी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचला होता.
(हेही वाचाः हॉटेलातील डीलक्स रूममध्ये ‘तो’ ८ महिने राहिला, बिल मागितले आणि…)
असा रचला हत्येचा कट
बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील माने यानेच मनसुख हिरेनला कांदिवली युनिटमधून तावडे साहेब बोलत असल्याचे फोनवर सांगून त्याला भेटण्यास बोलावून घेतले. त्यानंतर सुनील माने याने मनसुख हिरेनला संतोष शेलार, मनीष सोनी, सतीश मोटकर आणि आनंद जाधव यांच्या ताब्यात दिले. या चौघांनी मनसुख हिरेनची हत्या करुन मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून दिला होता. विनायक शिंदे आणि नरेश गोर यांनी या सर्व कट कारस्थानामध्ये सिम कार्ड मिळवून दिले होते.
Join Our WhatsApp Community