वाझेचा सहकारी रियाज काझीला अटक! आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणातील ही दुसरी अटक असून, आणखी काही अधिकारी यांना अटक होण्याची शक्यता आहे.

149

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात एनआयएने पुन्हा अटकसत्र सुरू केले आहे. सचिन वाझेला गुन्ह्यात सहकार्य करुन गुन्ह्यातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी, सीआययुचे अधिकारी एपीआय रियाज काझी याला रविवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. रियाज काझी याला आज सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणातील ही दुसरी अटक असून, आणखी काही अधिकारी यांना अटक होण्याची शक्यता आहे.

अजून काही अधिकारी रडारवर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवल्याप्रकरणी, सचिन वाझे याला १३ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. २७ दिवसांच्या एनआयए कोठडी नंतर शुक्रवारी सचिन वाझेला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. दरम्यान या गुन्ह्यात सीआययु मध्ये सचिन वाझे याचे सहकारी असलेले एपीआय रियाज काझी, पीएसआय प्रकाश ओव्हळ, आणि दोन पोलिस शिपाई एनआयएच्या रडारवर होते. त्यांची एनआयएकडून तीन ते चार वेळा चौकशी करण्यात आली होती.

(हेही वाचाः देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना सीबीआयचे समन्स! नवीन माहिती समोर येणार?)

काझी होणार माफीचा साक्षीदार?

एपीआय रियाज काझी याला सरकारी साक्षीदार बनवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेरीस रविवारी सकाळी एनआयएने रियाज काझी याला चौकशीसाठी बोलावून त्याला आज अटक करण्यात आली आहे. रियाज काझी हा घटनेच्या दिवसापासून सचिन वाझे सोबत होता. तसेच त्याने या गुन्ह्यातील अनेक पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेला मदत केली असल्याचा आरोप काझी याच्यावर आहे.

काय आहे काझी कनेक्शन?

सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी सोसायटीला केलेल्या पत्रव्यवहारात काझीची स्वाक्षरी होती. हे फुटेज काझीने वाझेच्या सांगण्यावरुन मिळवून ते नष्ट केल्याचे संशय एनआयएला आहे. या फुटेज मध्ये अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ कार ही घटनेच्या काही दिवस अगोदर वाझे यांच्या साकेत सोसायटीत पार्क करण्यात आली होती. हा पुरावा कोणाच्या हाती लागू नये म्हणून, वाझे यांनीच रियाज काझी याला हे फुटेज ताब्यात घेण्यास सांगितले होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. रियाज काझी यांनी साकेत सोसायटीला दिलेले हे पत्र एटीएसच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.