लॉकडाऊनमध्ये बियर-बार सुरू ठेवण्यासाठी असे होते वाझेचे ‘रेटकार्ड’

महिन्याला हप्ता पोहोचवण्याची जबाबदारी निकटवर्तीय असलेल्या ४ बारमालकांना देण्यात आली होती.

87

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात बियर बार सुरू ठेवण्यासाठी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेने बारचे रेट कार्ड ठरवल्याचा धक्कादायक खुलासा एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आला आहे. बार सुरू ठेवण्यासाठी दरमहा १ लाख ते ३ लाख रुपये रेट ठरवून दिला होता. वसुलीसाठी ४ बारमालकांची नेमणूक देखील वाझेने करुन दिल्याचे एका बार मालकाने एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

वाझेचे कारनामे

पोलिस दलापासून १७ वर्षे दूर राहिल्यानंतर पुन्हा मुंबई पोलिस दलात रुजू होऊन तत्कालीन आयुक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेला बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेचे एकेक करुन अनेक कारनामे लोकांसमोर आले आहेत. अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेऊन प्रकरण अंगलट येत असल्याचे कळताच कार मालक आणि वाझेचा जवळचा मित्र मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली होती. सचिन वाझेने हे कृत्य करण्यासाठी मुंबई पोलिस दलाचा व आजी-माजी पोलिस अधिका-यांचा पुरेपूर वापर करुन त्यांना देखील या कृत्यात सामील करुन घेतले.

(हेही वाचाः महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळ निर्दोष, दमानिया उच्च न्यायालयात जाणार!)

वाझेचे वसुली कांड

सचिन वाझेने मुंबई पोलिस दलात पुन्हा आगमन करण्यापूर्वीच मुंबईत हप्ते वसुलीची मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्याने बार मालक, बिल्डर यांना सूचना देऊन कोण किती हप्ता देणार याचे रेटकार्ड ठरवले होते. ही वसुली करण्यासाठी त्याने खाजगी वसुली गॅंग देखील तयार केली होती. सचिन वाझे पोलिस दलात रुजू होताच त्याला मुंबई पोलिस दलात महत्वाची पोस्टिंग देण्यात आली.

असे होते रेटकार्ड

वाझेने मुंबईतील सुमारे २०० बारची यादी तयार केली होती. पश्चिम उपनगरातील १०७ बियर बार आणि पूर्व व मध्य मुंबईतील ९१ बारची यादी त्याने तयार केली. कोरोनाचा काळ असल्यामुळे बार मालकांनी केलेल्या विनंतीवरुन रेटकार्ड कमी करण्यात आले होते. छोटे बार दरमहा १ लाख रुपये, त्यापेक्षा थोडे मोठे बार २ लाख रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या बार मालकांना ३ लाख रुपये महिन्याला हप्ता पोहोचवण्याची जबाबदारी निकटवर्तीय असलेल्या ४ बारमालकांना देण्यात आली होती.

(हेही वाचाः कंगनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली! आता पुढे काय?)

बारमालकांची कबुली

जो बारमालक हप्ता देणार नाही त्याच्या बारवर छापा टाकून, त्याच्यावर गुन्हा दाखल करुन बारचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. ही माहिती खुद्द वाझेने वसुलीसाठी नेमलेल्या ४ बारमालकांनी एनआयएला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरपोपत्रातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.