वाझेंचे समर्थक-विरोधक समोरासमोर! 

अंबानी प्रकरणात सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. 

अंबानी प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर त्यांची ही अटक राजकीय अटक असल्याचे सांगत त्यांचे समर्थन करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आघाडी घेतली आहे. त्याच वेळी आता त्यांना निलंबित करा, त्यांची नार्को चाचणी करा, अशी मागणी भाजप करू लागली आहे.

गृहमंत्र्यांचे मौन! 

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके आढळून आली. त्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. या तपासात जे काही उघड होईल. त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, अशी सावध प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात दिली. तर वाझे यांनी निलंबित करणार का?, असा सवाल करताच देशमुख यांनी बोलण्यास नकार दिला.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र! – संजय राऊत 

मुंबई पोलिसांची क्षमता जगाला माहीत आहे. मनसुख प्रकरणात ‘एनआयए’चा प्रवेश हा त्या क्षमेतवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे दिला होता. एटीएसने आतापर्यंत मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक प्रकरणांचा तपास केला आहे. अनेक गुन्हेगारांना फासावर लटकवले आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास केला. २६/११ चा हल्ला परतावून लावला. असे असताना जिलेटिनच्या कांड्यांसाठी राष्ट्रीय तपास पथक ज्या पद्धतीने मुंबईत आले. तपास केला ते आश्चर्यकारक आहे. ‘एनआयए’ला दहशतवादाचा तपास करायचा होता की सचिन वाझे यांना तुरुंगात टाकून राजकीय हिशेब पूर्ण करायचा होता? ह्याच सचिन वाझे यांनी काही महिन्यांपूर्वी या सगळ्यांच्या प्रिय टीव्ही अँकरला तुरुंगात ढकलले होते. कुठल्याही दबावाखाली न येता टीआरपी घोटाळ्याचा तपास केला होता. मुंबईचे पोलीस कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. पण राज्यात घुसायचे. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा हेच सध्या सुरू आहे. केंद्राचा दबाव आणि दहशत आहे, हे दाखवण्यासाठीच ही कारवाई झाली आहे. गुन्हेगाराला शिक्षा व्हायला पाहिजे. पण ती शिक्षा देण्यास मुंबई पोलीस सक्षम नाहीत हे भाजपला आणि केंद्राला कोणी सांगितले, असा संताप शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा : अंबानी प्रकरण : ‘त्या’ गाडीच्या मागे वाझेंची होती इनोव्हा, आणखी पोलीस अधिकारी रडारवर! )

सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप! 

वाझेंना खलनायक ठरवले! – नाना पटोले 

विरोधकांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा उद्योग सुरू आहे. सचिन वाझेंना खलनायक बनविण्याचे काम विरोधक करत आहेत, खोटे आरोप करायचे हे विरोधकांचे काम आहे. तपास यंत्रणानी नार्को टेस्ट करायची असेल तर करू द्यावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

गृहमंत्री, पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करा! – सोमय्या

मला आशा आहे की सचिन वाझे गँगच्या आणखी सदस्यांची अटक होईल. मुंबई पोलीस आयुक्तांनी 3 दिवस वाझे यांच्याशी काय चर्चा केली? ठाकरे सरकारने पोलिसांना वाझेंच्या संरक्षणासाठी, वाचविण्यासाठी वापरले. त्यामुळे अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदावरून, तर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.

हा स्थानिक प्रश्न! –  शरद पवार

सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले.

वाझेंची नार्को टेस्ट करा! – राम कदम

जिलेटीन स्फोटकांच्या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 288 आमदारांना विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायची होती. भाजपने केवळ सचिन वाझे यांना अटक करावी, इतकीच मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकारने ही मागणी मान्य केली नाही. सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात?, असा सवाल भाजपचे नेते राम कदम यांनी केली आहे.

वाझेंच्या ‘त्या’ व्हॉट्सअप स्टेटस मागील काय होते संकेत? 

अंबानी प्रकरणी जी स्फोटकांनी भरलेली गाडी एनआयएने ताब्यात घेतली आहे. त्यासोबत इन्होवा गाडी सापडली होती, ती गाडी सचिन वाझे हेच वापरात होते, हे समोर आले आहे. त्यामुळे एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. त्याआधी शनिवारी, १३ मार्च रोजी एनआयएने सचिन वाझे यांची १२ तास चौकशी केली होती. दरम्यान आता आपल्याला अटक होणार असून आपल्याविरोधात सर्व यंत्रणा कार्यरत झाली आहे, हे लक्षात येताच सचिन वाझे यांनी त्याची पूर्व कल्पना शनिवारी सकाळी १० वाजताच तसे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून सहकारी आणि आप्तेष्टांना पूर्व कल्पना दिली होती, असे सूत्रांकडून समजते.

काय होते ते व्हॉट्सअप स्टेटस? 

3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्याच सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. त्या केसचा निकाल अजूनही अनिर्णित आहे. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला अडचणीत आणण्यासाठी आणि चुकीच्या प्रकरणात गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या घटनांमध्ये थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here