एसटी संपाला ब्रेक नाही! आजही कर्मचाऱ्यांचा मुक्काम आझाद मैदानातच

संपाबाबत उद्या सकाळी 11 वाजता निर्णय

मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल जो येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. असे असले तरी ऐतिहासिक पगारवाढीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे आजही एसटी संपकऱ्यांची रात्र आझाद मैदानात जाणार आहे. दरम्यान, या संपाबाबत उद्या सकाळी 11 वाजता निर्णय घेऊ, अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीकरता एसटी कर्मचारी गेल्या 15 दिवसांपासून आझाद मैदानात आहेत. मात्र आजच्या बैठकीनंतरही यावर तोडगा न निघाल्यानं कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आजची रात्रही थंडीत जाणार आहे. दरम्यान, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याचीही घोषणा केली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानंतर पडळकर आणि खोत आझाद मैदानात दाखल झालेत.

(हेही वाचा – अखेर ‘लालपरी’चे विलिनीकरण लटकले, मात्र कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ)

एसटीच्या इतिहासातील ऐतिहासिक पगार वाढ

परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत होतील, अशी हमी दिली. जे कर्मचारी सेवेत 1 वर्ष ते 10 वर्ष या श्रेणीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 झालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली असून एसटीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि ऐतिहासिक पगार वाढ असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here