सहारा इंडिया समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय (Subrata Roy) यांचे मंगळवारी, १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७५ वर्षांचे होते. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रतो रॉय दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांचे पार्थिव लखनऊमधील सहारा शहरात आणले जाणार असून, तिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवारी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुब्रतो रॉय (Subrata Roy) सहारा यांचा जन्म १० जून १९४८ रोजी झाला. ते भारतातील आघाडीचे व्यापारी आणि सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते. गोरखपूरच्या शासकीय तांत्रिक संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यांनी १९७६ मध्ये गोरखपूर येथून व्यवसायाला सुरुवात केली. १९९२ मध्ये सहारा समूहाने राष्ट्रीय सहारा नावाचे वृत्तपत्र काढले. याशिवाय कंपनीने ‘सहारा टीव्ही’ नावाचे स्वतःचे टीव्ही चॅनेल देखील सुरू केले होते. कंपनी मीडिया, रिअल इस्टेट, फायनान्ससह अनेक क्षेत्रात काम करीत आहे.
(हेही वाचा IND vs NZ Semi Final : भारतीय संघातून मोहम्मद सिराज खेळणार नाही, कोण आहे बदली खेळाडू?)
Join Our WhatsApp Community