साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साई बाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. या निर्णयानंतर भाविकांना आता साई समाधीला हाताने स्पर्श करून साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत समाधी समोरील काचा आणि जाळी हटवण्यासह आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
(हेही वाचा – राऊतांना दिल्लीतील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा फोन अन् चर्चांना उधाण!)
साईभक्तांच्या मागणीनुसार, सामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधीपुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येण्या-जाण्याकरता मार्ग मोकळा करणे, साईची आरती सुरू असताना भाविकांना गुरूस्थान मंदिराची परिक्रमा करू देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिकेट काढणे आणि श्री साई सच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहेत ते लवकर उपलब्ध करून देणे, यासारखे निर्णय घेण्यात आल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी दिली आहे.
यंदा दिवाळीच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणी लाखो भक्तांनी दर्शन घेतले आणि कोट्यवधींचे दान केले आहे. यावेळी भाविकांनी साईंच्या झोळीत कोट्यवधींचे भरभरून दान दिले आहे. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या १५ दिवसांत तब्बल १८ कोटी रूपयांचे दान साई संस्थानला प्राप्त झाले आहे. यामध्ये रोख रक्कम, चेक, सोने-चांदी यासह २९ देशातील परकीय चलनाचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community