मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सेंट जॉर्जमध्ये पुन्हा स्वतंत्र कोरोना उपचार केंद्र

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्यावर गेलेली असताना सेंट जॉर्ज रुग्णालय गुरूवारपासून पुन्हा एकदा स्वतंत्र कोरोना रुग्ण उपचारांसाठी राखीव ठेवले जाणार आहे. जेजे रुग्णालयातील कोरोना नियंत्रण समितीत याबाबतचा निर्णय झाला असून, मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हा निर्णय झाल्याची माहिती समितीतील सदस्यांनी दिली.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उपचारांच्या पद्धती तसेच आवश्यक तयारीसाठी ही बैठक जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांनी बोलावली होती. त्यावेळी रुग्णांना उपचारांसाठी लागणाऱ्या आवश्यक सोयीसुविधा याबाबत चर्चा झाली. समितीतील सदस्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉन तसेच त्याच्या उपप्रकाराबाबतच्या चाचण्या, बाधित रुग्णाच्या सहवासात आलेल्यांची चाचणी याबाबत चर्चा केली गेली. मुंबईत कोरोना रुग्ण लक्षणेविरहित आढळून येत असल्याने तूर्तास सहवासातील लोकांची कोरोना चाचणी न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यानंतर नुकतेच जेजेशी संलग्न असलेले सेंट जॉर्ज रुग्णालय सर्व रुग्णांसाठी खुले झाले होते मात्र आता सेंट जॉर्ज रुग्णालय पूर्वी प्रमाणे केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव करण्याचे ठरले आहे.

सध्या सेंट जॉर्ज मध्ये 11 तर कामा रुग्णालयात 5 कोरोनाच्या रुग्णांना उपचार दिले जात आहेत.
डॉ पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here