मुंबईतील साकीनाका येथे एका महिलेवर टेम्पोत बलात्कार करून क्रूरपणे तिची हत्या करणाऱ्या आरोपीला दिंडोशीच्या सत्र न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले असून त्याच्या शिक्षेवर १ जून रोजी सुनावणी होणार आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला असून या नराधमाला न्यायालय काय शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा : पोलीस आयुक्तांच्या निर्देशानंतरही रेल्वे स्थानकांवरील फेरीवाल्यांचा विळखा आवळलेलाच)
आरोपीला अटक
साकीनाका येथे राहणाऱ्या एका महिलेवर १० सप्टेंबर २०२१ रोजी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोत बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवून तिला जखमी करण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास ती गंभीर अवस्थेत तेथील सुरक्षारक्षकाला दिसली. नंतर सुरक्षारक्षकाने मुंबईच्या मुख्य नियंत्रण कक्ष येथे फोन करून कळवले. साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला टेम्पोसह राजवाडी रुग्णालयात आणले. राजावाडी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी क्षणाचा विलंब करता गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेऊन काही तासातच आरोपी मोहन चौहान (४८) याला अटक करण्यात आली होती.
शिक्षेवर सुनावणी होणार
या संतापजनक घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. महिला संघटनांनी या घटनेचा विरोध करून आरोपीला फासावर लटकावा अशी मागणी केली होती. मुंबई सारख्या शहरात या प्रकारच्या घटना घडू लागल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. महिला आयोगाने या घटनेची गंभीर देखल घेतली होती, सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचा आदेश दिला होता. दिंडोशी सत्र जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात आला, आरोपीविरुद्ध साकीनाका पोलिसांनी ७७ साक्षदाराच्या जबाबासह ३४६ पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. जलदगती न्यायालयाने घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदार, इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी मोहन चौहान याला सोमवारी दोषी ठरवले आहे. १ जून रोजी आरोपी चौहान याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community