साकिनाका बलात्कार प्रकरणी आरोपपत्र दाखल! ‘इतक्या’ दिवसांत तपास झाला पूर्ण!

दोषारोप पत्र ३४६ पानांचे असून त्यात ७७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

133

साकिनाका येथील पाशवी बलात्कार आणि नंतर निर्घृण हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत तपास पूर्ण केला. त्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोप सादर करण्यात आले. हे दोषारोप पत्र ३४६ पानांचे असून त्यात ७७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. ऍट्रॉसिटी ऍक्ट, बलात्कार आणि हत्या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून हे दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

११ सप्टेंबर रोजी झालेला मृत्यू

पश्चिम उपनगरातील साकिनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ३० वर्षीय महिलेवर नराधमाने सामूहिक बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड टाकण्यात आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पीडित या महिलेचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात हा अमानवीय प्रकार घडला होता. साकिनाका पोलिस ठाण्याच्या कंट्रोल रुमला शुक्रवारी पहाटे 3.30च्या सुमारास फोन आला. खैरानी रोड परिसरात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी काही तासांतच आरोपी मोहन चौहान याला बेड्या ठोकल्या होत्या.

(हेही वाचा : गटविम्याबाबत भाजप नगरसेवकाची स्थायी समिती अध्यक्षांकडे ‘ही’ मागणी)

आता लक्ष आरोपीच्या शिक्षेकडे

त्यानंतर मात्र राज्यपातळीवर या प्रकरणी सरकारवर जोरदार टीकाटिप्पणी होऊ लागली. त्यामुळे अखेर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत समय मर्यादेत तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचे आरोपपत्र सादर केले असून आता या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषीला लवकर शिक्षा होणार का, हे पहावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.